
आज तुम्ही ज्या खासदारकीवर बसला आहात ते पद तुमच्या स्वकर्तृत्वामुळे नव्हे तर भाजपच्या आशीर्वादामुळे मिळालेले ‘गिफ्ट’ आहे. त्यामुळे फुशारक्या मारू नका, संयमाने काम करा. मानसिक संतुलन बिघडल्यासारखी वक्तव्य कराल तर एक दिवस कट्टर आणि निष्ठावान शिवसैनिक तुम्हाला सळो की पळो करून सोडतील, असा इशारा शिवसेना नेते राजन विचारे यांनी शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना दिला. लाखो शिवसैनिकांची निष्ठा आजही ‘मातोश्री’ आणि ठाकरे कुटुंबाशी आहे हे लक्षात ठेवा, असेही विचारे यांनी म्हस्के यांना ठणकावले.
राजन विचारे यांनी नरेश म्हस्के यांच्या पोपटपंचीचा समाचार घेतला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यावर महाराष्ट्रातील जनतेचा प्रचंड विश्वास आहे. पण म्हस्के यांच्यासारख्या गद्दारांनी त्यांच्यावर टीका करणे म्हणजे निव्वळ त्यांना असलेला प्रसिद्धीचा सोस आहे. त्यांच्या या भुंकण्याला महाराष्ट्रातील जनता मुळीच किंमत देत नाही.
तुमचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार होता
एकेकाळी एकनाथ शिंदे यांच्या जाचाला कंटाळून छत्रपती शिवाजी महाराज मैदानात नरेश म्हस्के यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार होता. त्यावेळी याच राजन विचारेला उद्धवजींचा फोन आला आणि तुम्हाला शिवसेनेत परत आणले याचा विसर पडू देऊ नका, अशी आठवण विचारे यांनी करून दिली.
राजकारणात तुम्हाला जे स्थान मिळाले ते उद्धव ठाकरेंमुळेच
आज तुम्ही खासदार झाले आहात, पण किमान त्या पदाला साजेशी बौद्धिक पातळी तरी दाखवा, अन्यथा तुमच्या मेंदूला बुरशी लागली आहे की काय असे लोकांना वाटेल. राजकारणात तुम्हाला जे काही स्थान मिळाले ते तुमच्या कर्तृत्वामुळे नव्हे तर फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मिळाले हे विसरू नका, असे खडे बोलही विचारे यांनी सुनावले. ‘मातोश्री’च्या कृपेने नगरसेवक, महापौरपदापासून अनेक महत्त्वाची पदे उपभोगूनही नरेश म्हस्के आपल्या अकलेचे तारे तोडत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याची त्यांची लायकी आहे काय? टीका करण्याआधी म्हस्के यांनी स्वतःची लायकी आठवावी, असेही ते म्हणाले.




























































