
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सेवानिवृत्त पोलिसांसाठी संवेदनशील असलेला घराचा प्रश्न पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे मांडला आहे. मुंबईच्या रक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या सेवानिवृत्त पोलिसांना मुंबईत हक्काची घरे द्या आणि दंडात्मक शुल्कातही सवलत द्या, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले आहे. सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबईमध्ये हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासंदर्भात यापूर्वी आपल्यासोबत बैठक पार पडली होती. त्या बैठकीत पोलीस पत्नी प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. पोलिसांना घरे उपलब्ध करून देण्याबाबत त्या बैठकीत सरकारची भूमिका सकारात्मक नव्हती, तरीही या संवेदनशील विषयाकडे आपले लक्ष आहे याची मला जाणीव आहे, असे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
9 मार्च 2026 रोजी गृह राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आल्याचे समजते. तरी यासंदर्भात भविष्यात होणाऱ्या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घेण्यात यावे, जेणेकरून सेवानिवृत्त तसेच सेवेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करता येईल, असेही आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे. मुंबईतील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांवर लादण्यात येणारे दंडनीय शुल्क कमी आणि माफक करण्यात यावे, अशी विनंतीही आदित्य ठाकरे यांनी निवेदनात केली आहे.
भरतीसाठी येणाऱ्या भावी पोलिसांना निवासाची व्यवस्था करा
पोलीस दलात भरतीसाठी तयारी करत असलेल्या तरुण-तरुणींनाही त्या-त्या शहरांमध्ये भरतीच्या कालावधीत योग्य निवास व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून त्यांना उड्डाणपुलावर किंवा रस्त्यावर झोपण्याची वेळ येणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी निवेदनात आवर्जून नमूद केले आहे.





























































