
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना ‘ई-चलान’द्वारे प्रलंबित दंड भरण्याची सक्ती करणाऱ्या पोलिसांना आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. दंड भरण्यासाठी सक्ती करताना वाहनचालकांशी पोलीस उद्धटपणे वागतात अशा तक्रारी आहेत. त्यामुळे अशा प्रकारची सक्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी दिले असून उद्धटपणे वागणाऱ्या पोलिसांची गय केली जाणार नाही, अशी तंबीही दिली आहे. या निर्देशाचे उल्लंघन करणाऱ्या पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
प्रलंबित ई-चलान वसुलीसाठी वाहतूक पोलिसांकडून राज्यात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी पोलीस वाहनचालकांना रस्त्यात अडवून ‘दंड आताच भरा, अन्यथा वाहन किंवा कागदपत्रे जप्त करू’ अशी दमदाटी करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पोलिसांच्या अशा वर्तणुकीमुळे जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे. गृह विभागाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पोलिसांच्या या वर्तनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
स्वेच्छेने दंड भरला तरच स्वीकारा
ई-चलानद्वारे दंड वसुलीसाठी वाहतूक विभागाने ‘आदर्श कार्यप्रणाली’ (एसओपी) जाहीर केली आहे. वाहनचालक स्वेच्छेने दंड भरण्यास तयार असेल तरच तो स्वीकारावा, असे त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. वाहन जप्तीसारखी कारवाई केवळ न्यायालयाच्या आदेशानेच करण्यात यावी. रस्त्यात वाहनचालकांना अडवून त्यांच्याशी उद्धटपणे बोलू नये, असेही त्यात म्हटले आहे.





























































