
<<< पराग खोत >>>
मराठी व्यावसायिक रंगभूमीवर सध्या नव्या विषयांची, नव्या पिढीच्या संवेदनांना भिडणारी नवनवी नाटके येताना दिसत आहेत. त्या मालिकेत आता ‘लागली पैज?’ या नव्याकोऱ्या नाटकाची भर पडली आहे. नात्यातील प्रेम, स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षा यांच्यातील संघर्षाला हलक्याफुलक्या पण भावनिक पद्धतीने मांडणारे हे नाटक प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते. प्रभात थिएटर्स निर्मित हर्षद प्रमोद कठापूरकर यांचे लेखन आणि अंकुर अरुण काकतकर यांचे दिग्दर्शन असलेले हे नाटक नव्या पिढीच्या जगण्यावर एका वेगळ्या कोनातून प्रकाशझोत टाकते.
नाटकाची कथा आजच्या तरुणाईच्या नात्यांभोवती फिरते. आदित्य आणि रेवा या दोन परस्परविरोधी स्वभावाच्या व्यक्तींची ही गोष्ट आहे. रेवा ही वर्तमानात जगणारी, मुक्त स्वभावाची आणि जीवनाकडे खेळकर दृष्टीने पाहणारी मुलगी आहे. तिची आई वंदनादेखील आयुष्य हलक्याफुलक्या पद्धतीने जगणारी स्त्री. दुसरीकडे आदित्य मात्र पूर्णतः वेगळा भविष्यातील चिंता आणि भूतकाळातील खंत यांच्या ओझ्याखाली दबलेला एक प्रामाणिक मुलगा. अशा दोन विरुद्ध स्वभावाचे लोक एकमेकांना भेटतात आणि नकळत प्रेमात पडतात. त्यांच्या नात्यातील वैशिष्ट्य म्हणजे रेवाची पैजा लावण्याची सवय. जिंकण्यासाठी नव्हे, तर त्या प्रक्रियेतल्या थरारासाठी ती पैजा लावते. एका अपघाती भेटीतून सुरू झालेली त्यांची मैत्री पुढे लग्नापर्यंत पोहोचते. मात्र नात्यातील खरे प्रश्न तेव्हाच पुढे येतात जेव्हा आदित्यची आपल्या आयुष्याबद्दल असलेली असमाधानाची जाणीव तीव्र होते.
आदित्य नोकरीत समाधानी नाही. त्याचे खरे स्वप्न स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे आहे, पण त्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्याचे धाडस त्याच्याकडे नाही. रेवाच्या वाढदिवसाच्या रात्री तो आपल्या मनात साठलेली ही घुसमट व्यक्त करायचा प्रयत्न करतो, पण त्याच क्षणी रेवा त्याला अनपेक्षितरीत्या थांबवते. ती त्याला लॉटरीच्या तिकिटावरील नंबर तपासून पाहण्याची विनंती करते आणि पुढे घडणारी घटना त्यांच्या आयुष्याला नवे वळण देते. लॉटरीच्या तिकिटावरील 16 पैकी 15 नंबर जुळतात! पण सोळावा नंबर काय सांगतो? त्या एका नंबरमध्येच त्यांच्या नात्याचे भविष्य दडलेले आहे. नात्यात प्रेम टिकवायचे की महत्त्वाकांक्षेला संधी द्यायची, या प्रश्नाभोवती नाटकाची खरी नाट्यमयता उभी राहते.
या नाटकाची आणखी एक विशेष बाब म्हणजे अभिनेता यशोमान आपटे आणि अभिनेत्री रुमानी खरे यांची जोडी. यशोमान आपटेने अनेक मालिकांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा सहज अभिनय आणि पडद्यावरची उपस्थिती रंगमंचावरही प्रभावी ठरते. आदित्यच्या अंतर्मुख, द्वंद्वात अडकलेल्या व्यक्तिरेखेला त्याने नेमकेपणाने साकारले आहे. तर दुसरीकडे गीतकार संदीप खरे यांची कन्या रुमानी खरे या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहे. तिच्या रेवामधील मुक्तता, उत्स्फूर्तपणा आणि भावनिक गुंतागुंत प्रेक्षकांना आपलीशी वाटते. ही मुलगी पुढे जाऊन आपली नाममुद्रा उमटविणार हे नक्की. त्या दोघांमधील केमिस्ट्रीसुद्धा तितकीच सुंदर आहे. सुप्रिया विनोद आणि शंतनू अंबाडेकर यांनीही आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.
नाटकात संगीताचीही खास रंगत आहे. बऱयाच वर्षांनंतर संदीप खरे यांनी नाटकासाठी गाणी लिहिली असून संगीतकार साई-पियूष यांनी त्यांना सुरांची जोड दिली आहे. ही गाणी कथानकाला भावनिक उंची देतात. दिग्दर्शक अंकुर काकतकर यांनी नाटकाचा वेग आणि भावनिक संतुलन चांगल्या प्रकारे सांभाळले आहे. संवाद हलकेफुलके असले तरी त्यातून नात्यांतील गुंतागुंत स्पष्ट होते. काही ठिकाणी नाटक रेंगाळते, ऑफ ट्रक होते, पण पुढे ते पुन्हा वेग घेते. विशेष म्हणजे आजच्या तरुणाईच्या मनातील प्रश्न, करिअर, स्वप्नं आणि नात्यांची जबाबदारी यांना हे नाटक थेट भिडते. लक्ष वेधून घेणारे नेपथ्य आणि प्रभावी प्रकाशयोजना नाटकाला पूरक ठरतात.
सध्या मराठी रंगभूमीवर जुन्या, पुनरुज्जीवित नाटकांची भाऊगर्दी पाहायला मिळतेय. सोबतच बडी नावं असलेली काही नाटकं उत्तम व्यवसाय करीत आहेत. नाटकाच्या प्रेक्षकाला भरपूर चॉईस आहे. अशा वेळी दोन तरुण कलाकारांना घेऊन एका वेगळय़ा विषयावरच्या नाटकाला हात घालण्याचे धाडस करणाऱ्या प्रभात थिएटर्सच्या ज्योती कठापूरकर आणि निखिल करंडे यांचं विशेष कौतुक. नवे लेखक, दिग्दर्शक आणि कलावंत सतत रंगभूमीवर यायला हवेत. वेगवेगळे विषय घेऊन निरनिराळे प्रयोग व्हायला हवेत. ‘लागली पैज’ हा असाच एक सशक्त प्रयत्न आहे आणि नाट्यरसिकांनी त्याला दाद देण्यासाठी आवर्जून नाट्यगृहात जायला हवे. त्यातूनच अधिक सकस आणि आश्वासक असे काहीतरी निर्माण होईल.
एकंदरीत ‘लागली पैज?’ हे केवळ प्रेमकथेवर आधारित गोष्ट नाही, तर प्रेम आणि महत्त्वाकांक्षा यांच्या संघर्षाची ही भावनिक कहाणी आहे. नातं टिकवण्यासाठी किती पैजा लावाव्या लागतात आणि त्या पैजांचा शेवट कुठे होतो, हा प्रश्न नाटक संपल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत राहतो. मराठी रंगभूमीवर आजच्या पिढीची भाषा बोलणारे हे नाटक निश्चितच लक्षात राहणारे ठरते.
लेखक ः हर्षद कठापूरकर
दिग्दर्शक ः अंकुर काकतकर
कलाकार ः यशोमान आपटे, रुमानी खरे, सुप्रिया विनोद, शंतनू अंबाडेकर
गीते ः संदीप खरे
संगीत ः साई-पियूष
निर्माते ः ज्योती कठापूरकर, निखिल करंडे
सहनिर्माते ः ज्योती पाटील, प्रियांका बिष्ट, रूपा करोसिया आणि मनोज मोटे
सूत्रधार ः संतोष शिदम





























































