मुंबईकरांचे लग्नसोहळे ‘गॅस’वर, सिलिंडरच्या तुटवड्याची शुभकार्यांना झळ; कॅटरर्स धास्तावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती देशांतील युद्धाची धग सर्वच ठिकाणी पोहोचली आहे. सर्वसाधारणपणे फेब्रुवारी-मार्चपासून ‘लगीनघाई’ सुरू होते. यंदा लग्नाच्या धामधुमीतच युद्धाच्या परिणामामुळे गॅस सिलिंडर तुटवड्याचे विघ्न उभे ठाकले आहे. गॅस सिलिंडरचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याने कॅटरर्स धास्तावले आहेत. अनेक कॅटरर्सनी लग्न सोहळ्याच्या आगाऊ ऑर्डर्स घेणे बंद केले आहे. त्यामुळे मुंबईकरांचे लग्नसोहळे ‘गॅस’वर आहेत. जवळपास दहा हजारांहून अधिक वधू-वर कुटुंबीयांनी लग्नसोहळ्यांचा बेत तूर्तास ‘होल्ड’वर ठेवला आहे.

गॅस सिलिंडरच्या तुटवड्याने संपूर्ण देशाला चिंतेच्या खाईत लोटले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला याचा मोठा फटका बसला आहे. 30 टक्क्यांहून अधिक हॉटेल्स-रेस्तराँनी शटर डाऊन केले आहे. त्यासोबतच कॅटरिंगचा व्यवसाय गॅस सिलिंडरअभावी पूर्णपणे ढेपाळला आहे. गॅस सिलिंडर चढ्या भावाने घेण्याची वेळ आल्याने कॅटरर्सनी लग्न समारंभ, साखरपुडे व इतर शुभकार्यांच्या आगाऊ ऑर्डर्स घेणे बंद केले. युद्धाच्या परिणामाला तोंड द्यावे लागतेय. आतापर्यंत मोजके गॅस सिलिंडर मिळवले. पुढच्या काही दिवसांत सिलिंडर मिळेल की नाही, याची तीव्र चिंता वाटतेय, अशी प्रतिक्रिया पाटणकर कॅटरर्सच्या संचालकांनी दिली. दुसरीकडे लग्नाच्या हॉल्सचे बुकिंग गेल्या आठवड्यापासून थंडावल्याचे जोगेश्वरीतील ‘मांगल्य हॉल’च्या व्यवस्थापकांनी सांगितले. यंदा लग्नाचे बरेच शुभमूहूर्त आहेत. त्यामुळे लग्न हॉल्सच्या बुकिंगला मोठा प्रतिसाद अपेक्षित होता, परंतु कॅटरर्सकडून जास्त दर आकारणी केली जाऊ शकते, या शक्यतेने वधू-वर कुटुंबीयांनी लग्नकार्याच्या तारखेचा बेत तूर्तास ‘होल्ड’वर ठेवला आहे. एकट्या मुंबई शहरातील जवळपास 10 हजारांहून अधिक लग्नसमारंभांचे बुकिंग घटल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

लालबागमधील प्रसिद्ध ‘लाडूसम्राट’ची सेवा बंद

व्यावसायिक गॅसच्या टंचाईचा फटका मुंबई शहरातील लोकप्रिय हॉटेल्स आणि खानावळींना बसला आहे. सिलिंडर नसल्यामुळे लालबाग येथील प्रसिद्ध ‘लाडूसम्राट’ हॉटेलच्या मालकांना आपली सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवावी लागली आहे. दक्षिण मुंबईत पाईप गॅस नसल्यामुळे 100 टक्के हॉटेल्सना व्यावसायिक गॅस सिलिंडरवर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी, गॅसटंचाईच्या समस्येमुळे एकापाठोपाठ एक हॉटेलला ‘शटर डाऊन’ करावे लागत असल्याचे ‘आहार’ संघटनेचे माजी अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी सांगितले.

‘मेन्यू कार्ड’मधून अनेक पदार्थ गायब

शहरातील हॉटेल्सच्या ‘मेन्यू कार्ड’मधून अनेक पदार्थ गायब होऊ लागले आहेत. गॅस सिलिंडरअभावी सर्वच मेन्यू बनवणे शक्य नसल्याची हतबलता हॉटेल्स मालकांनी प्रवेशद्वारावरच लावली आहे. त्यामुळे खाद्यप्रेमींनी अनेक हॉटेल्समध्ये ‘मिसळ पाव’वरच भूक भागवावी लागत आहे. मुंबई महापालिकेच्या कॅण्टीनलादेखील गॅसटंचाईचा फटका बसला असून येथे अनेक ग्राहकांना भेळवर समाधान मानावे लागत आहे.

मुंबई पोलिसांच्या कॅण्टीन बंद

गॅस तुडवड्याचा मोठा फटका मुंबई पोलीस दलालाही बसला आहे. मुंबई पोलिसांची आझाद मैदान, नायगाव आणि भायखळा येथील उपाहारगृह बंद करण्यात आली आहेत. पोलीस मुख्यालयातील उपाहारगृह बुधवारी कसेबसे सुरू ठेवण्यात आले. मात्र तिथे डाळ-भात, चहा याशिवाय कोणतेही पदार्थ बनू शकले नाहीत. मुंबई महापालिका मुख्यालयातील उपाहारगृहातही मेन्यूला कात्री लावण्यात आली आहे.

रत्नागिरीत हॉटेलच्या टेरेसवर चुली

गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हॉटेलचालकांनीही चुलीचा आधार घेतला आहे. चुलींसाठी जागा नसल्यामुळे रत्नागिरीतील टीआरपी येथील हर्षा हॉटेलच्या मालकाने चक्क हॉटेलच्या टेरेसवर तीन चुली पेटवल्या आहेत. सरपणासाठी लाकडेही गोळा करून आणली आहेत.