
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता जागतिक वित्तीय क्षेत्रावरही दिसू लागला आहे. सिटीग्रुप, स्टॅंडर्ड चार्टर्ड यांनी सुरक्षेच्या कारणास्तव दुबईमधील त्यांच्या कार्यालयांमधून कर्मचारी बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. तर एचएसबीसीने कतारमधील आपल्या सर्व शाखा तात्पुरत्या बंद केल्या आहेत. इराणकडून अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित आखाती बँकिंग हितसंबंधांना लक्ष्य करण्याच्या धमक्यांनंतर या बँकांनी खबरदारीची पावले उचलली आहेत.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सिटीग्रुपने आपल्या कर्मचाऱ्यांना दुबई इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर आणि औद मेथा परिसरातील कार्यालये रिकामी करण्यास सांगितले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले की, कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्य असून व्यवसाय सुरळीत ठेवण्यासाठी आकस्मिक योजना तयार करण्यात येत आहेत. दरम्यान, स्टॅंडर्ड चार्टर्डची संयुक्त अरब अमिरातीमध्ये मोठी उपस्थिती आहे. दुबई हे जेपी मोरगन चेस आणि एचएसबीसी सारख्या आंतरराष्ट्रीय बँकांसाठी महत्त्वाचे आर्थिक केंद्र मानले जाते.
ग्राहकांना पाठवलेल्या सूचनेनुसार एचएसबीसेने कतारमधील सर्व शाखा तात्पुरत्या बंद केल्या आहेत. कर्मचारी आणि ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे बँकेने सांगितले. एचएसबीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्जेस एलहेडरी यांनी सांगितले की, “आमच्या सहकाऱ्यांची आणि ग्राहकांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.”
तेहरानमधील खतम अल अनबिया सेंट्रल हेडक्वार्टर्स या लष्करी कमांडच्या प्रवक्त्याने सांगितले की, इराणने या प्रदेशातील अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित आर्थिक आणि बँकिंग हितसंबंधांना लक्ष्य करण्याची योजना आखली आहे. तणाव वाढत असतानाच दुबई विमानतळाजवळ ड्रोन कोसळल्याची घटना घडली, ज्यामध्ये चार जण जखमी झाले आहेत.





























































