
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, जर इराणने अमेरिकेच्या मागण्यांना सहकार्य केले नाही, तर ट्रम्प इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांच्या हत्येच्या कारवाईला पाठिंबा देऊ शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दुसऱ्या मुलाला, 56 वर्षीय मोज्तबा खमेनी यांना देशाचा नवा सर्वोच्च नेता म्हणून निवडण्यात आले. मात्र या निर्णयावर ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फाॅक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, “मला इराणच्या नेतृत्वाची ही निवड आवडलेली नाही. मला वाटत नाही की, मोज्तबा खमेनी शांततेत राहू शकतील.”
अमेरिकेच्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने इराणने आपला अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे बंद करणे आणि आंतरराष्ट्रीय दबावाला सहकार्य करणे यांचा समावेश आहे. जर इराणने हे नाकारले, तर नव्या नेत्याविरुद्ध कठोर कारवाई होऊ शकते, असे अहवालात म्हटले आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, अशी कोणतीही कारवाई इस्त्रायलच्या नेतृत्वाखाली होऊ शकते.
दरम्यान, न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी त्यांच्या मृत्युपत्रात मुलगा मोज्तबा यांना उत्तराधिकारी बनवू नये, असे स्पष्ट लिहिले होते. मात्र शक्तिशाली इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड क्राॅप्स (IRGC)ने शेवटी मोज्तबा खामेनी यांना या पदावर आणण्यासाठी दबाव टाकला होता. मोज्तबा खामेनी यांनी यापूर्वी कधीही अधिकृत सरकारी पद भूषवले नव्हते. तरीही ते अनेक वर्षे त्यांच्या वडिलांच्या सत्ताकेंद्रात पडद्यामागे प्रभाव टाकत असल्याचे मानले जाते. 2000 च्या दशकात लीक झालेल्या अमेरिकन राजनैतिक केबल्समध्ये त्यांचे वर्णन पडद्यामागील खऱ्या शक्ती असे करण्यात आले होते.
दरम्यान, इस्रायली लष्कराने इशारा दिला आहे की जो कोणी इराणच्या नेतृत्वाखाली दहशतवादाला पाठिंबा देईल, त्याला लक्ष्य मानले जाईल. विश्लेषकांच्या मते, इराणमध्ये नेतृत्व बदल आणि अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यातील तणावामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती आणखी अस्थिर होण्याची शक्यता आहे.
























































