
देशातील एलपीजी टंचाईच्या मुद्द्यावरून आज लोकसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी हे गॅस संकटावर निवेदन देण्यासाठी उभे राहिले असता, विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. विरोधकांनी केवळ घोषणाबाजीच केली नाही, तर “देखो देखो कोण आया? एपस्टिन तेरा दोस्त आया…” अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.
एलपीजी तुटवड्यावरून विरोधकांनी सुरुवातीपासूनच सरकारला धारेवर धरले होते. हरदीप पुरी भाषणासाठी उभे राहताच विरोधकांनी “हरदीप पुरी राजीनामा द्या” आणि “गो बॅक, गो बॅक, हरदीप पुरी गो बॅक” अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. विशेषतः एपस्टिनच्या नावावरून दिलेल्या घोषणांमुळे सभागृहातील वातावरण अधिकच तापले. या जोरदार गदारोळामुळे काही काळ मंत्र्यांच्या भाषणात व्यत्यय आला.
अमेरिका सरकार खुल्या केलेल्या एपस्टीन फाईल्समध्ये केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचा उल्लेख अनेकदा आला आहे. एपस्टीन फाइल्स उघडल्यानंतर किमान सात देशांतील नेत्यांनी राजीनामे दिले, मात्र मोदी आणि पुरी यांचे नाव या फाइल्समध्ये येऊनही ते अजून पदावर आहेत. यावरूनच विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
























































