त्याला गोळ्या घाला! पाकिस्तान क्रिकेटच्या अवस्थेवर माजी खेळाडू संतापला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Basit Ali Slams Pakistan After Humiliating Loss to Bangladesh Saamana

T20 World Cup 2026 मधील खराब कामगिरीनंतर संघ उभारणीचा दावा करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाला बांगलादेशने जोरदार चपराक दिली आहे. पहिल्या एकदिवसीय (ODI) सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा अवघ्या ११४ धावांत खुर्दा केला आणि ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानची ही अवस्था पाहून त्यांचे माजी खेळाडू प्रचंड संतापले असून त्यांनी संघ व्यवस्थापनावर जहरी टीका केली आहे.

पाकिस्तानचा नवा नीचांक

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ ३०.४ षटकांत ११४ धावांवर गारद झाला. बांगलादेशच्या नाहिद राणाने २४ धावांत ५ बळी घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडले, तर कर्णधार मेहदी हसन मिराजने ३ बळी घेतले. बांगलादेशने हे आव्हान केवळ १५.१ षटकांत २ गडी गमावून पूर्ण केले. हा पाकिस्तानचा बांगलादेशविरुद्धचा एकदिवसीय इतिहासातील सर्वात निचांकी धावसंख्या ठरली आहे.

बासित अलींचा संताप: ‘त्याला गोळ्या घाला’

पाकिस्तानचे माजी खेळाडू बासित अली यांनी ‘द गेमप्लॅन’ या शोमध्ये आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ‘ज्याने या खेळाडूंना पहिल्या १० षटकांत किमान ६० धावा करण्याचा सल्ला दिला, त्याला आधी गोळ्या घाला (Shoot the man). अशा माणसाने कधीच मैदानात क्रिकेट खेळलेले नसते, तो फक्त कागदाचा तुकडा हातात देतो. येथील परिस्थिती काय आहे हे त्याला दिसले नाही का? हे त्याला माहित नव्हते का?’

पाकिस्तानची स्थिती ४१/० वरून ९.२ षटकांत ९२/९ अशी झाली होती. यावरून त्यांच्या फलंदाजीच्या रणनीतीचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले.

‘क्लब दर्जाचेही क्रिकेट नाही’

माजी यष्टीरक्षक कामरान अकमलनेही संघावर कडक शब्दांत टीका केली. तो म्हणाला, ‘असे वाटत होते की एक आंतरराष्ट्रीय संघ आहे आणि दुसरा एखादा क्लब संघ विश्वचषकापूर्वी सराव सामना खेळत आहे. क्लब क्रिकेटमध्येही खेळाडू इतके वाईट खेळत नाहीत. आमच्या खेळाकडे पाहून मला बासित अलींशी बोलायला शब्द सुचत नव्हते.’

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेचे पुढील दोन सामने शुक्रवार आणि रविवारी ढाका येथे होणार आहेत.