8 वर्षांपूर्वीची प्रायव्हेट ऑडिओ क्लिप व्हायरल; रश्मिका मंदानाच्या संतापाचा कडेलोट, कायदेशीर कारवाईचा दिला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा हे नुकतेच लग्नबंधनात अडकले. राजस्थानमध्ये दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. दोघेही लग्नानंतरचे गुलाबी दिवस अनुभवत असतानाच रश्मिका मंदाना हिची 8 वर्षांपूर्वीची एक प्रायव्हेट ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. हा प्रकार म्हणजे गोपनीयतेचे उल्लंघन असल्याचे म्हणत रश्मिकाने ही क्लिप शेअर करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

गेल्या 24 तासांपासून सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये रश्मिकाच्या कुटुंबातील एक सदस्य तिच्या आणि अभिनेता रक्षित शेट्टी यांच्या जुन्या नात्याबद्दल भाष्य करत असल्याचे ऐकू येते. ही क्लिप समोर आल्यानंतर रश्मिकाने सोशस मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आपली बाजू मांडली.

ही क्लिप संबंधितांच्या संमतीशिवाय रेकॉर्ड करण्यात आली आहे. संपूर्ण संभाषणातील केवळ एक छोटा भाग कापून तो चुकीच्या पद्धतीने पसरवला जात आहे, ज्यामुळे संदर्भाचा अनर्थ होत आहे गेल्या आठ वर्षांपासून मी सातत्याने चुकीची माहिती, छळ आणि ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करत आहे. माझ्या नावावर अनेक खोट्या गोष्टी खपवल्या गेल्या. आतापर्यंत मी गप्प होते, पण आता माझ्या कुटुंबालाही यात ओढले जात आहे. हे सहन करण्याच्या पलीकडे आहे, असे रश्मिका म्हणाली.

हे अत्यंत दिशाभूल करणारे आणि मानहानीकारक आहे. ज्या मीडिया प्लॅटफॉर्म्सनी किंवा इन्फ्लुएन्सर्सनी ही क्लिप शेअर केली आहे, त्यांनी ती 24 तासांच्या आत काढून टाकावी, अन्यथा मला कायदेशीर पाऊल उचलावे लागेल, असे रश्मिकाने ठणकावून सांगितले. तसेच रश्मिकाने या क्लिपच्या टायमिंगवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नुकतेच तिच्या वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे क्षण आले असताना अशा प्रकारे जुन्या गोष्टी उकरून काढणे संशयास्पद असल्याचे तिने म्हटले आहे. आपल्या सन्मानासाठी आणि मानसिक शांततेसाठी आता गप्प न राहण्याचा निर्णय घेतल्याचे तिने स्पष्ट केले.

दरम्यान, रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांचा विवाह 26 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानमझधील उदयपूरमध्ये पार पडला. त्यानंतर त्यांनी सिनेसृष्टीतील मित्रांसाठी हैदराबादमध्ये एका ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले होते. सुखी संसाराची सुरुवात करत असतानाच कुणीतरी खोडसाळपणा करत जुनी ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचे समोर आले आहे.