इराणमध्ये अडकलेल्या 9 हजार हिंदुस्थानींना बाहेर काढण्याची योजना, अझरबैजान-आर्मेनियामार्गे आणण्याची तरतूद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. या पार्श्वभूमीवर इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, भारत इराणमधील आपल्या नागरिकांना अझरबैजान आणि आर्मेनिया या शेजारील देशांमार्गे बाहेर पडण्यास मदत करत आहे. माहितीनुसार सध्या इराणमध्ये सुमारे ९ हजार हिंदुस्थानी नागरिक आहेत. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी, खलाशी, व्यापारी तसेच काही यात्रेकरूंचा समावेश आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक हिंदुस्थानींना मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैसवाल यांनी सांगितले की, सरकार इराणमधील नागरिकांच्या सतत संपर्कात आहे. जे नागरिक तेथून बाहेर पडू इच्छितात त्यांना जमीनमार्गे अझरबैजान किंवा आर्मेनियाला पोहोचण्यास मदत केली जात आहे. हिंदुस्थानी नागरिकांना व्हिसा मिळवून देणे आणि सीमा ओलांडण्यास मदत करणे यासाठी आमचा दूतावास सक्रिय आहे. तेथून ते व्यावसायिक विमानांनी हिंदुस्थानात परतू शकतात,” असे जयस्वाल यांनी सांगितले.

हिंदुस्थानी दूतावासाने राजधानी तेहरानमध्ये राहणाऱ्या अनेक हिंदुस्थानी नागरीकांना देशातील इतर सुरक्षित शहरांमध्ये हलवले आहे. काही नागरिकांना आधीच सीमेपलीकडे पोहोचण्यास मदत करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने इराणमधून जमीनमार्गे बाहेर पडण्याची योजना करणाऱ्या हिंदुस्थानींना दूतावासाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री यांच्यात अलीकडे तीन वेळा चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली. या चर्चांमध्ये सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानच्या ऊर्जा सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर ही चर्चा झाली आहे.