परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यात संवाद, चर्चेचा तपशील गुलदस्त्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यपूर्वेतील तणाव वाढत असताना हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी गेल्या काही दिवसांत तीन वेळा चर्चा केल्याची माहिती नुकतीच हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, सर्वात अलीकडील चर्चेत सागरी वाहतूक आणि सुरक्षा या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर दबाव निर्माण झाला असून विशेषतः होर्मुझ परिसरातील परिस्थिती संवेदनशील बनली आहे.

मात्र या चर्चेबाबत अधिक माहिती देण्याची ही योग्य वेळ नसल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुंबई येथे सौदी अरेबियातून कच्चे तेल घेऊन आलेला, लायबेरियाच्या ध्वजाचा टँकर सुरक्षितपणे दाखल झाला आहे. मध्य पूर्वेतील संघर्ष सुरू झाल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्ग काढत हिंदुस्थानात पोहोचणारे हे पहिले जहाज ठरले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की सध्या इराणमध्ये सुमारे ९ हजार हिंदुस्थानी नागरीक आहेत. यामध्ये विद्यार्थी, खलाशी, व्यापारी, यात्रेकरू यांचा समावेश आहे.