
मध्य पूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या तणावावर पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली असून, संपूर्ण प्रदेशात शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी हिंदुस्थानची कटिबद्धता अधोरेखित केली आहे. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी X वर एक पोस्ट करून माहिती दिली.
X वर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, “प्रदेशातील गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधला. क्षेत्रात वाढता तणाव, निष्पाप नागरिकांचा जाणारा बळी आणि नागरी पायाभूत सुविधांच्या होत असलेल्या नुकसानाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. हिंदुस्थानी नागरिकांची सुरक्षा, तसेच मालवाहतूक आणि ऊर्जेचा विनाअडथळा पुरवठा ही हिंदुस्थानची सर्वोच्च प्राथमिकता आहे. शांतता आणि स्थिरतेसाठी हिंदुस्थानच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि संवाद तसेच मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले.”

























































