
तेल व गॅसच्या टंचाईमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमागील कारणे सांगताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभागृहात हरदीप पुरी व अमेरिकेतील सेक्स स्पँडलमधील गुन्हेगार जेफ्री एपस्टीन यांच्या मैत्रीचा उल्लेख केला. त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल यांना लगेचच रोखले आणि बोलू दिले नाही. त्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.
इराण युद्धामुळे हिंदुस्थानात उद्भवलेल्या परिस्थितीवर राहुल गांधी यांनी सभागृहात विचार मांडले. ‘ऊर्जा सुरक्षा हा कोणत्याही देशाचा पाया असतो. तो पायाच मोदी सरकारने भुसभुशीत केला आहे. हिंदुस्थानने तेल आणि गॅस कोणाकडून खरेदी करायचा हे ठरविण्याचा अधिकार सरकारने अमेरिकेला दिला आहे. सरकारने ही परवानगी का दिली याचा शोध घेतला असता मोदींनी शरणागती पत्करल्याचे उघड झाले,’ असे राहुल म्हणाले.
अजूनही वेळ गेलेली नाही; राहुल यांचा इशारा
‘देशातील सध्याची गॅस टंचाईची स्थिती सपशेल फसलेल्या परराष्ट्र धोरणाचा परिणाम आहे. जे झाले ते झाले. आता सरकारने जागे व्हायला हवे. अजून वेळ गेलेली नाही. सरकारने तातडीने ऊर्जा सुरक्षेची तयारी सुरू करायला हवी. अन्यथा कोटय़वधींचे नुकसान होईल,’ असा इशारा राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
हरदीप पुरींच्या घशाला कोरड
हरदीप पुरी आज लोकसभेत येताच विरोधकांनी ‘देखो देखो काैन आया, एपस्टीन तेरा दोस्त आया,’ अशी शेरेबाजी केल्याने गदारोळ उडाला. तोच धागा पकडून राहुल गांधी यांनी पुरींनाही टोला हाणला. ‘जेफ्री एपस्टीन हा पुरी यांचा मित्र असल्याचे त्यांनी स्वतः कबुल केले आहे. त्यामुळे सत्ताधाऱयांना ही घोषणा झोंबण्याचे कारण नाही, असे राहुल म्हणाले. ओम बिर्ला यांनी लगेचच त्यांना रोखले. त्यावर, मी तेलाच्या विषयाला जोडूनच हा मुद्दा मांडत आहे.’ हरदीपसिंग यांच्या मुलीने जॉर्ज सोरोसकडून पैसे घेतले, याचे कागदोपत्री पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा राहुल यांनी यावेळी केला. राहुल यांचे भाषण सुरू असताना हरदीप पुरी घाबरलेले दिसले. त्यांच्या घशाला कोरड पडली होती. ते वारंवार पाणी पित होते.




























































