युद्ध जिंकल्याची टिमकी ट्रम्प वाजवत असतानाच… अमेरिका आणि ग्रीसची दोन तेलवाहू जहाजे इराणने उडवली! एका हिंदुस्थानीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘इराणविरुद्धचे युद्ध आम्ही जिंकल्याची टिमकी डोनाल्ड ट्रम्प वाजवत असतानाच इराणने आज अमेरिकेला जबर हादरा दिला. होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न करणारी दोन तेलवाहू जहाजे इराणच्या सुसाईड बोटींनी उडवून दिली. यात एक अमेरिकेचे, तर एक ग्रीसचे जहाज आहे. या दोन्ही जहाजांवरील हल्ल्यात एका हिंदुस्थानीचा मृत्यू झाला असून 25 खलाशांना वाचवण्यात यश आले आहे.

‘सेफसी विष्णू’ आणि ‘झेफीरॉस’ अशी हल्ला झालेल्या जहाजांची नावे आहेत. इराक बंदरावर इंधन भरून ही जहाजे प्रवासाला निघाली होती. होर्मुझ सामुद्रधुनीच्या हद्दीत असताना इराणने स्फोटकांनी भरलेल्या बोटी धडकवून त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर जहाजावर आगडोंब उसळला. इराकी पोर्ट्स कंपनीच्या बोटींनी पेटत्या जहाजावरून 25 खलाशांची सुटका केली. बेपत्ता खलाशांचा शोध सुरू आहे.

15 हिंदुस्थानी बचावले

इराणने हल्ला केलेल्या ‘सेफसी विष्णू’ या जहाजावरील एका खलाशाचा मृत्यू झाला, तर, 15 खलाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले. बगदादमधील हिंदुस्थानी दूतावासाने ही माहिती दिली. हल्ल्यानंतर इराकमधील तेलाची बंदरे व्यापारासाठी पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.

इराणचा इस्रायलवर चौथा मोठा हल्ला

हिजबुल्लाच्या मदतीने इस्रायवर सलग पाच तास हल्ले केल्यानंतर इराणने आज इस्रायलवर चौथा सर्वात मोठा बॅलिस्टिक मिसाइल हल्ला चढवला. जेरुसलेम आणि तेल अवीव येथील हवाई तळ आणि इस्रायलची सुरक्षा संस्था शीन बेटच्या कार्यालयांना लक्ष्य करून इराणने मिसाइल डागली. यात 100 हून अधिक इस्रायली जखमी झाले आहेत.

सिनेगॉगवर कारहल्ला

मिशिगनमध्ये एका अज्ञाताने ‘टेम्पल इस्रायल’ या ज्यू सिनेगॉगला कारची धडक देऊन गोळीबार केल्याची घटना घडली आहे. हा हल्ला ठरवून केल्याचा दाट संशय तपास अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे.

हिंदुस्थानला होर्मुझ बंदीच

हिंदुस्थानी जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक करण्यासाठी इराणने सवलत दिल्याचे वृत्त इराणने फेटाळले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर व इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यात झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हे वृत्त पसरले होते.

मोदी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी बोलले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी गुरुवारी फोनवरून चर्चा केली. मोदींनी मध्य पूर्वेतील वाढता तणाव, नागरिकांचे बळी आणि नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. हिंदुस्थानी नागरिकांची सुरक्षा, उर्जा आणि वस्तूंची अखंड वाहतूक या सर्वोच्च प्राधान्य असल्याचे मोदींनी सांगितले.

मोजतबा खामेनी यांची अमेरिकेला धमकी

इराणच्या सर्वोच्च पदी निवड झालेले मोजतबा खामेनी यांनी आज पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केले. अमेरिकेवर त्यांनी कठोर प्रहार केला. निरपराध नागरिकांच्या बलिदानाचा बदला इराण घेईल आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहील, असे त्यांनी ठणकावले. आखातातील अमेरिकेचे सर्व लष्करी तळ तातडीने बंद झाले पाहिजेत, नाहीतर तिथे हल्ले केले जातील, अशी धमकीही त्यांनी दिली.

अमेरिकेवर हल्ल्याची शक्यता नाही!

इराण कॅलिफोर्नियावर ड्रोन हल्ले करु शकतो, असा इशारा एफबीआयने दिला होता. मात्र, असा कोणताही धोका नाही, असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले.

युद्ध थांबवण्यासाठी इराणच्या तीन अटी

‘युद्धाची सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार आणि तोही आमच्या अटींवर करणार,’ असे सांगत इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी आज युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला तीन अटी घातल्या. ‘आमचे कायदेशीर अधिकार मान्य करा, युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या आणि भविष्यात असे हल्ले करणार नाही अशी हमी जगाच्या साक्षीने द्या,’ असे त्यांनी नमूद केले.