‘जय भवानी, जय शिवाजी’… जयघोषाने फोर्ट दुमदुमणार, आज भव्यदिव्य शिवराय संचलन; उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी फोर्टची भूमी सज्ज झाली आहे. हॉर्निमन सर्कल ते हिंदुस्थानच्या प्रवेशद्वारापर्यंतचा (गेटवे ऑफ इंडिया) परिसर भगवामय झाला आहे. शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे आयोजित भव्यदिव्य असे शिवराय संचलन उद्या होणार आहे. वाजतगाजत, पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या या शिवराय संचलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या सायंकाळी 4 वाजता हॉर्निमन सर्कल येथून शुभारंभ होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनभेदी जयघोषांनी फोर्टचा परिसर दुमदुमणार आहे.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने दरवर्षी शिवजयंतीनिमित्त शिवराय संचलनाचे आयोजन केले जाते. यंदाही ते त्याच जल्लोषात, उत्साहात साजरे होत आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची संचलनाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. फोर्टच्या हॉर्निमन सर्कल येथील रिझर्व्ह बँकेच्या अमर बिल्डिंग ते हिंदुस्थानचे प्रवेशद्वार (गेटवे ऑफ इंडिया) असे हे संचलन होईल. त्यानंतर गेटवेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून आणि मानवंदना देऊन संचलनाची सांगता होईल. लोकाधिकार महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते व सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महासंघाचे कार्याध्यक्ष माजी आमदार विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे व सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या सहकार्याने आयोजित या संचलनात शिवसेनेचे नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विभागप्रमुख, महिला विभाग संघटक आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहणार आहेत.

हुतात्मा स्मारक आणि शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करणार

संचलनादरम्यान हुतात्मा स्मारकास मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण करण्यात येईल. तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी चौक येथील वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करण्यात येईल.