
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच विधान भवनासह मुंबईतील चार ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने आज खळबळ उडाली. त्यामुळे तत्काळ पोलीस यंत्रणा सतर्क झाली. विधान भवनातील सर्व कर्मचारी आणि नागरिकांना बाहेर काढून संपूर्ण परिसराची पोलिसांनी कसून तपासणी केली, मात्र कुठेही बॉम्ब सापडला नाही. तरीही विधान भवन आणि परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली असून सावधगिरीचा उपाय म्हणून अभ्यागतांना विधान भवन प्रवेशाचे पास देणे थांबवण्यात आले आहे.
सकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या ई-मेलवर एक मेल आला. विधान भवनासह मुंबईतील स्टॉक एक्स्चेंज, उच्च न्यायालय, मेट्रो आणि बँक बॉम्ब-मिसाईलने उडवून देऊ असे ई-मेलमध्ये म्हटले होते. यानंतर पोलिसांनी परवानगी घेऊन विधान भवनात प्रवेश केला आणि तपासणी सुरू केल्याची माहिती विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.
बॉम्ब डिस्पोजल आणि डिटेक्शन स्कॉड आणि डॉग स्कॉडकडून विधान भवन आणि परिसराच्या कानाकोपऱयाची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीत विधान भवनात कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. मेल कुणी केला, धमकी कुणी दिली, याची माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाही, असेही राम शिंदे म्हणाले. संवेदनशील ठिकाणांबाबत सदर धमकी मिळाली असल्यामुळे पूर्ण तपासानंतरच त्याची माहिती देऊ, असे त्यांनी सांगितले. काही वेळाने तपासणी पूर्ण झाल्यानंतर सर्वांना विधान भवनात प्रवेश दिला गेला आणि सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली.
विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याने पोलीस यंत्रणांनी विधान भवन व आसपासच्या परिसराची कसून तपासणी सुरू केल्यानंतर आजचे कामकाज स्थगित करून अधिवेशनाचा कालावधी एक दिवसाने वाढवावा, अशी मागणी शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी केली.
बॉम्बची धमकी खोटी, गृहराज्यमंत्र्यांची माहिती
या घटनेनंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत परिस्थिती स्पष्ट केली आणि जनतेला घाबरून न जाण्याचे आवाहन केले. प्राथमिक तपासात ई-मेल बोगस होता असे दिसून आले असून असे ई-मेल पाठवून प्रशासनाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातो, असे योगेश कदम म्हणाले. काही विकृत व्यक्ती राज्यातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत असून बॉम्बची धमकी खोटी असल्याचे तपासात पुढे आल्याचे पंकज भोयर यांनी सांगितले.




























































