
गोवंडीतील पालिकेच्या पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालय सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) चालविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. या रुग्णालयाचे खासगीकरण केल्यास पूर्व उपनगरातील गोरगरीब रुग्णांचे हाल होण्याची भीती आहे. महापालिका स्वतः सक्षम असताना खासगी संस्थांना यात सामील करण्याची गरज काय, असा सवाल करत शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी खासगीकरणाच्या मागणीचा फेरविचार करावा, अशी मागणी केली.
गोवंडी परिसरात मोठय़ा प्रमाणात झोपडपट्टी असून येथील हजारो सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी शताब्दी रुग्णालयावर अवलंबून असल्याकडे सरकारचे लक्ष वेधत सचिन अहिर यांनी गोवंडी रुग्णालयाच्या खासगीकरणास कडाडून विरोध केला. त्यावर मंत्री उदय सामंत म्हणाले, गोवंडीतील शताब्दी रुग्णालय 43 वर्षे जुने असून येथे 210 खाटांचे रुग्णालय कार्यरत आहे. पीपीपी मॉडेलवर वैद्यकीय महाविद्यालयासह 580 खाटांचे रुग्णालय बांधले जाईल. त्यापैकी 264 खाटा मुंबई महानगरपालिकेसाठी राखीव ठेवल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.




























































