
बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे सरोवराच्या काठावरील मंदिरांमध्ये भाविकांना दर्शनासाठी जाता येत नाही. पण या सरोवरातील पाण्याचा उपसा करण्यासाठी वन्यजीव विभागाची परवानगी आवश्यक आहे. सरोवरातून पाण्याचा उपसा करण्याच्या संदर्भात उद्या (शुक्रवारी) बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधानसभेत दिले.
बुलढाणा जिल्ह्यातील आमदार सिद्धार्थ खरात यांनी यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत याकडे शासनाचे लक्ष वेधले. पाणी उपसा करण्यासाठी 41 लाख रुपयांच्या निधीची तरतूद झाली आहे. मात्र वन्यजीव विभाग आणि पुरातत्त्व विभागात समन्वय नसल्याने पाणी उपसा रखडले आहे. त्यामुळे या परिसरात असलेले गायमुख, रामगया, पाप हरेश्वर मंदिर, कमलजा मंदिरासह सहा मंदिरे पाण्याखाली गेली असल्याचे त्यांनी सांगितले.
खरात यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री नाईक म्हणाले की, यंदा मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्याने इथे मोठय़ा प्रमाणात झरे मोकळे झाले. त्यामुळे लोणार सरोवराची पाणीपातळी 20 ते 25 फूट वाढली. त्यामुळे इथली मंदिरे दर्शनासाठी खुली नाहीत. यासंदर्भात आयुक्त आणि जिल्हाधिकाऱयांबरोपबर चर्चा करून तातडीने वन्यजीव विभागाची परवानगी घेण्यासाठी बैठक घेण्यात येईल, असे नाईक म्हणाले.
मला निलंबित करा
लोणार सरोवर व संवर्धन समितीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना स्थान नसल्याबाबतही सिद्धार्थ खरात यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला मंत्री नाईक यांनी उत्तर दिले नाही आणि अध्यक्षांनी पुढील लक्षवेधी पुकारली. त्यामुळे सिद्धार्थ खरात आक्रमक झाले होते. मला बोलायला देत नाही, मला निलंबित करा, असा आक्रमक पवित्रा खरात यांनी घेतला. विरोधी
बाकावरील सदस्यांनी पाठिंबा दिला.
अतिसंरक्षित प्राण्यांच्या यादीतून बाहेर काढून बिबटय़ांचा बंदोबस्त करणार
पुणे, अहिल्यानगर, नाशिकमध्ये बिबटय़ांचे माणसांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे बिबटय़ांना पायबंद घालण्यासाठी अतिसंरक्षित प्राण्यांच्या यादीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. बिबटय़ांना ‘अनुसूची-1’मधून ‘अनुसूची-2’मध्ये आणण्यासाठी सरकारची धडपड सुरू झाली आहे.
आमदार सत्यजीत देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील शिराळा येथील बिबटय़ाच्या आक्रमणात 6 वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर वन मंत्री गणेश नाईक यांनी त्या क्षेत्रातील वनक्षेत्रपालावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे बिबटय़ाला अतिसंरक्षित प्राण्यांच्या अनुसूची-1मधून बाहेर काढून अनुसूची-2मध्ये टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
बिबटे वनतारामध्ये पाठवणार
‘वनतारा वनक्षेत्रात 25 बिबटय़ांची रवानगी करण्यात आली असून आणखी 25 बिबटय़ांची रवानगी पुढील काळात करण्यात येणार आहे. केंद्रीय वन्यजीव विभागाच्या अनुमतीने बिबटय़ांना अन्य राज्यांत पाठवण्याचा निर्णय घेण्यात येईल. बिबटय़ांच्या वावराविषयी उपग्रहाद्वारे लक्ष ठेवण्यात येईल,’ अशी माहितीही गणेश नाईक यांनी दिली.



























































