अजितदादांच्या अपघातातील सत्य सांगा, राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. अपघाताच्या घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार का घेतली जात नाही? ऐन वेळी विमानाचा वैमानिक का बदलण्यात आला? विमानाला टेक ऑफ घेण्यास वेळ का लागला? अपघाताबाबत अशा अनेक शंका उपस्थित होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला अपघातामागचे सत्य सांगावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) आमदार  सुनील शेळके यांनी आज विधानसभेत केली.

अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना सुनील शेळके यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा उपस्थित झाला. 28 जानेवारीला बारामतीत जो विमान अपघात झाला त्या विमानात अजितदादा पवार खरेच होते का? इथपासून शंका उपस्थित होत आहेत. अजितदादांच्या विमानाला झालेल्या अपघाताबद्दल वेगवेगळे तर्क लावले जात आहेत, तसेच आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विमान अपघाताच्या तपासावर दबाव असल्याने तपासातून काहीच निष्पन्न होणार नसल्याचे सांगितले जात असल्याचे सुनील
शेळके म्हणाले.

स्टेडियमला अजित पवार यांचे नाव

पुण्यातील गहुंजे येथील क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचे नाव देण्यात यावे. तसेच विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीतून काय निष्पन्न झाले याची माहिती देण्यात यावी, अशी मागणी सुनील शेळके यांनी केली.