
कार व मोटारसायकल यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना नांदेड – उद्गीर राष्ट्रीय महामार्गावर घडली. या अपघातात मोटार सायकलस्वार जागीच ठार झाला आहे.
नांदेड – उद्गीर राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक 50 वर पाटोदा खूर्द (ता. जळकोट) येथे आज घडली आहे. धडक दिलेली कार व थार यांच्यात ओव्हरटेक करण्याची स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेच्या नादात धडक लागून दुचाकीस्वाराचा नाहक मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर सतत होणारे अपघात व त्यातून होणारी जीवितहानी हा एक चिंतेचा विषय बनत चालला आहे.
घोणसी (ता. जळकोट ) येथील साईनाथ जयराम जानतिने (वय 35 वर्षे) हे घोणसी येथून मोटारसायकलने जळकोटकडे येत होते. तर एक कार जळकोटकडून उद्गीरच्या दिशेने जात होती. ही दोन्ही वाहने राष्ट्रीय महामार्गावरील पाटोदा खूर्द जवळ येताच त्यांची आमनेसामने जोरदार धडक झाली. धडक एवढी जबरदस्त होती मोटारसायकल स्वार साईनाथ जानतिने हे आकाशात काही फूट उंच उडाले व दोनशे फूट दूर फेकले गेले व रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडले असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. खाली पडल्यानंतर जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.
साईनाथ जानतिने हे जळकोट येथे एका खासगी कंपनीत नोकरीला होते असे समजले. ते कामावर जळकोटला येत असताना हा अपघात झाला. या धडकेने कारच्या समोरचा भागही चेंदामेंदा झाला आहे. साईनाथ जानतिने यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगी, 1 मुलगा, 1 बहीण, 1 भाऊ व आई – वडील असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल घोणसी, जळकोट परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघातग्रस्त व्यक्तीचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय, जळकोट येथे उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला आहे.




























































