
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता स्थानिक उद्योगांवर उमटू लागले आहेत. इंडस्ट्रियल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अहिल्यानगर एमआयडीसीमधील 300 उद्योगांची चाके थांबली आहेत. त्यामुळे जवळपास तीन हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱहाड कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून गॅस उपलब्ध नसल्याने उत्पादन प्रक्रिया ठप्प झाली आहे.
एमआयडीसी परिसरातील अनेक उद्योगांमध्ये उत्पादनासाठी इंडस्ट्रियल गॅस अत्यावश्यक असतो. विशेषतः इलेक्ट्रिकल मोटार निर्मिती करणाऱया कंपन्यांमध्ये गॅसवर आधारित प्रक्रिया मोठय़ा प्रमाणावर केली जाते. मात्र, गॅसचा पुरवठा खंडित झाल्याने मोटार तयार करण्याचे विभागच बंद आहेत.
काही कंपन्यांमध्ये छोटय़ा प्रोजेक्टअंतर्गत सुमारे 700 मोटारी, तर मोठय़ा कंपन्यांमध्ये 7 हजारांपर्यंत मोटारीचे उत्पादन केले जाते. पण गॅसच्या कमतरतेमुळे उत्पादन पूर्णपणे ठप्प झाल्याने उद्योगांना आर्थिक फटका बसत आहे. उद्योगांतील कामकाज थांबल्याने तीन हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर हजारो कामगारांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता उद्योजकांनी व्यक्त केली आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने इंडस्ट्रियल गॅसचा पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.
हॉटेल व्यवसाय बंद होण्याची शक्यता
हॉटेल व्यावसायिकांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. सध्या काही व्यावसायिक उपलब्ध गॅस सिलिंडरवर पदार्थ बनवत आहेत. मात्र, येत्या दोन दिवसांत नवीन सिलिंडर उपलब्ध न झाल्यास अनेक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते. प्रशासन गॅस टाक्या उपलब्ध असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्ष टाक्या मिळत नसल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे.


























































