
औद्योगिक गॅसपुरवठा अगोदरच बंद झाला आहे. त्यात घरगुती गॅस सिलिंडरसाठी एजन्सीसमोर रांगा लागल्याने नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त लावण्याची वेळ आली.
एलपीजी गॅस विक्रीत कंपन्यांकडून डबल दरात विक्री होऊ लागल्याने शेकडो रिक्षाचालकांनी पेट्रोल पंपाला गराडा घातल्याने गोंधळ उडाला होता. याबाबत पुरवठा कार्यालयासोबत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचे पाहून रिक्षा संघटनांचे पदाधिकारीही हतबल झाले.
शहरात साडेचार हजारांहून अधिक रिक्षाचालक असून, पाच ठिकाणी एलपीजी गॅसपुरवठा पंप आहेत. यापूर्वी 43 रुपये प्रतिकिलो दर असताना चार ते पाच दिवसांत यात दुप्पट वाढ झाली. आज प्रथम 5 रुपयांची वाढ झाली, तर नंतर पंधरा मिनिटांत आणखी 5 रुपये वाढल्याने 80 रुपये प्रतिकिलो गॅस झाल्याचे पाहून संतप्त रिक्षाचालकांनी लिशा हॉटेल चौकातील पेट्रोल पंपाला रिक्षांसह गराडा घातला. दरवाढीवरून पेट्रोल पंप चालकाला रिक्षा चालक आणि पदाधिकाऱयांनी धारेवर धरले.
अहिल्यानगरात रिक्षांच्या रांगा
अहिल्यानगर: युद्धाची झळ नागरिकांसह हॉटेल, रिक्षाचालकांना बसू लागली आहे. एलपीजी गॅससाठी सक्कर चौकातील पंपाबाहेर गेल्या तीन ते चार दिवसांपासून वाहनांची एक किलोमीटरपर्यंत रांग लागल्याचे चित्र दिवसभर होते. एलपीजी गॅस असलेल्या रिक्षाचालकांना दिवसभर पंपाबाहेर उभे राहण्याची वेळ आली आहे. एलपीजी गॅसचे दर दुप्पट झाले असून, 50 रुपये किलोचा गॅस आता 85 ते 90 रुपये किलो झाला आहे.




























































