
महाराष्ट्र सरकारने आता शुद्धीवर यावे आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील छत्रपती शाहू महाराज आणि लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत पुतळे तातडीने बदलावेत, अशी मागणी आज इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आली. येथील छत्रपती शाहू महाराज स्मारक समाधिस्थळी निदर्शने करण्यात आली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील पुतळ्यांमध्ये कमालीची विसंगती असून, प्रसारमाध्यमांतूनही याकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता असलेले हे पुतळे बदलण्याचे आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2023च्या अधिवेशनात दिले होते. मात्र, पुढे याबाबत काहीच हालचाल न झाल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. इंडिया आघाडीच्या विविध पदाधिकाऱयांनी समाधिस्थळी आज एकत्र येत निषेध नोंदवला.
इंडिया आघाडीचे समन्वयक आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, दसरा चौकातील शाहू महाराजांचा पुतळा आणि जिल्हा परिषदेसमोरील यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा आणि दिल्लीतील या दोन्ही महापुरुषांचे पुतळे पाहिल्यानंतर महाराष्ट्र शासनाची दिवाळखोरी लक्षात येते. जर सत्तारूढ नेते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार असतील तर कोल्हापुरातून जन आंदोलन उभे करू आणि लोकवर्गणीतून दिल्लीतील हे पुतळे बदलू, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेना उपनेते संजय पवार, आर. के. पोवार, रियाज कादरी, विशाल देवकुळे, भरत रसाळे, कॉ. दिलीप पोवार, राजू जाधव, अनिल लवेकर, अशोक पोवार, अनिल घाटगे आदी उपस्थित होते.



























































