शाळेवरील हल्ल्याबाबत अमेरिका खोटं बोलतेय? ती शाळा अनेक वर्षांपासून इंटरनेटवर झळकत होती, ‘रॉयटर्स’चा तपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Bombed Iran School Had Long Online Presence Reuters Investigation Saamana (1)

इस्रायल सोबत अमेरिकेने इराणमध्ये संयुक्त कामगिरी करत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांना आणि त्यांच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना ठार मारलं. त्यानंतर आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती पाहायला मिळाली. अमेरिका आणि इस्रायलच्या प्रचंड माऱ्यामुळे इराणचे प्रचंड मोठे नुकसान झाले. यामध्ये अमेरिकेन एका शाळेला लक्ष्य केले. त्याबद्दल अमेरिकेने टार्गेट चुकले असे स्पष्टीकरण दिले. मात्र अमेरिका खोटे बोलत असल्याचे ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेच्या एका तपासात समोर आल्याचे वृत्तप्रसिद्ध झाले आहे.

इराणमधील मीनाब (Minab) येथील ज्या प्राथमिक शाळेवर अमेरिकेने क्षेपणास्त्र हल्ला केला, त्या शाळेचे अस्तित्व लपलेले नव्हते, तर ती शाळा अनेक वर्षांपासून इंटरनेटवर सक्रिय होती, असा खळबळजनक खुलासा ‘रॉयटर्स’च्या एका विशेष तपासातून झाला आहे. अमेरिकन लष्कराने ‘जुन्या डेटा’मुळे ही चूक झाल्याचा दावा केला असला, तरी शाळेच्या वेबसाइटवर मुलांचे फोटो, उपक्रम आणि गुगल मॅप्सवरील खुणा स्पष्टपणे उपलब्ध होत्या.

‘शजराह तय्येबा’ (Shajareh Tayyebeh) या मुलींच्या शाळेची स्वतःची वेबसाइट २०१५ पासून आर्काइव्हमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये गुलाबी आणि पांढऱ्या गणवेशातील मुलींचे वर्गातील आणि मैदानावरील डझनभर फोटो आहेत.

२०१८ पासूनच्या उपग्रह चित्रांमध्ये शाळेच्या रंगीत भिंती आणि मैदानावरील खुणा स्पष्ट दिसत होत्या. इतकेच नाही तर स्थानिक बिझनेस लिस्टिंगमध्येही या शाळेचा पत्ता ‘मुलींची शाळा’ असा स्पष्ट नमूद होता.

सॅटेलाइट डेटा आणि व्हिडिओ विश्लेषणातून असे सिद्ध झाले आहे की, या संकुलावर अमेरिकेच्या ‘टॉमहॉक’ (Tomahawk) क्रूझ क्षेपणास्त्रानेच हल्ला केला होता. एकापाठोपाठ झालेल्या सात स्फोटांनी शाळा आणि शेजारील लष्करी इमारत उद्ध्वस्त केली.

संयुक्त राष्ट्रांतील इराणच्या राजदूतांनी १५० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे, तर ‘इराणी रेड क्रिसेंट’नुसार हा आकडा १७५ पर्यंत पोहोचला आहे. २ मार्च रोजी मीनाबमधील स्मशानभूमीत एकापाठोपाठ २० थडगी खोदलेली सॅटेलाइट चित्रात दिसली आहेत, जिथे या निष्पाप जीवांना दफन करण्यात आले.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘हा हल्ला इराणनेच केला असावा, त्यांच्याकडेही टॉमहॉक असू शकतात,’ असा दावा केला होता. मात्र, अमेरिकन लष्करी तज्ज्ञांच्या मते, टॉमहॉक केवळ अमेरिकाच वापरते. संरक्षण तज्ज्ञ मार्क कॅन्सियन यांच्या मते, अमेरिकन सेंट्रल कमांडने आपल्या ‘टार्गेट लिस्ट’ची वेळोवेळी तपासणी न केल्यामुळे हा भीषण प्रकार घडला असावा.

शाळेची इमारत ही ‘आसेफ ब्रिगेड’ (इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे क्षेपणास्त्र युनिट) च्या अगदी मागे होती. जरी ही शाळा आयआरजीसीशी संबंधित शैक्षणिक संस्थेचा भाग असली, तरी तिथे केवळ लहान मुले शिकत होती, हे इंटरनेटवरील माहितीवरून सहज समजू शकले असते. अमेरिकेच्या या ‘इंटेलिजन्स फेल्युअर’मुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या युद्धनीतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

इराणविरोधात अमेरिकेने पुकारलेल्या या युद्धाबद्दल आधीच प्रश्न उपस्थित होत आहेत. इराणवर असे हल्ले करण्याआधी अमेरिकेच्या संसदेत यावर मत घेणात आले नाही, अमेरिकेचा असे युद्ध करण्यामागील हेतू प्रत्येकाने वेगवेगळा सांगितला. ट्रम्प स्वत: अनेकवेळा वेगवेगळी विधाने करत असतात. त्यांचे मंत्री वेगळीच माहिती देतात, त्यात शाळेवरील हल्ल्यामुळे ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत.