सिलिंडर चोरी होऊ नये म्हणून एजन्सीने नेमले बाऊन्सर, सिलिंडर न मिळाल्याने सामान्यांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूर शहरात एलपीजी सिलिंडर मिळवण्यासाठी गुरुवारी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. अनेक भागांमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह कुटुंबे रिकामे सिलिंडर हातात घेऊन गॅस एजन्सीबाहेर 2 ते 3 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लावून उभी होती. नागपूरच्या कडक उन्हात नागरिकांना तब्बल चार तासांपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.

टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार सकाळपासूनच नागरिकांनी गॅस एजन्सी कार्यालयांकडे धाव घेतल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एलपीजी वितरकांनी घरगुती सिलिंडरचा तुटवडा नसल्याचा दावा केला, मात्र ‘सिस्टीम फेल्युअर’मुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. वाढत्या गर्दीमुळे काही एजन्सींनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बाउन्सरही तैनात केले.

पूर्व, दक्षिण आणि मध्य नागपूरमधील अनेक गॅस एजन्सी कार्यालयांबाहेर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी दिसून आली. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मजूर वर्गाचे लोक रिकामे सिलिंडर घेऊन उन्हात उभे राहून आपल्या क्रमांकाची वाट पाहत होते. काही भागांत रांगा गल्लीबोळ ओलांडून मुख्य रस्त्यांपर्यंत पोहोचल्या आहेत.

काही एजन्सींनी तात्पुरते घरपोच सिलिंडर सेवा थांबवल्याने परिस्थिती आणखी बिघडली. त्यामुळे ग्राहकांना थेट एजन्सीच्या गोदामात जाऊन सिलिंडर घ्यावा लागत आहे. मात्र काही भागांत घरपोच सेवा सुरू असल्याचेही सांगितले जाते.

बीडीपेठ परिसरात रांगेत उभे असलेले चुन्नीलाल खंगार म्हणाले, “मी तीन दिवसांपूर्वी सिलिंडर बुक केला होता. आमच्या भागात घरपोच सेवा बंद असल्याने मला एजन्सीत यावे लागले. सुमारे अडीच तास रांगेत उभे राहिल्यानंतर सिलिंडर मिळाला.”

मात्र सर्वांनाच सिलिंडर मिळाला असे नाही. किरणबाई कांबळे म्हणाल्या, “माझ्या मुलाने अनेकदा बुकिंग करण्याचा प्रयत्न केला आणि एजन्सीला फोनही केला, पण संपर्क झाला नाही. त्यामुळे मी एजन्सीत आले. तीन तासांहून अधिक वेळ रांगेत उभे राहिल्यानंतर कळले की बुकिंगच झालेले नाही. आता माझ्याकडे एकच सिलिंडर आहे आणि तोही रिकामा आहे. कुटुंबासाठी स्वयंपाक कसा करायचा?”

ऑनलाईन बुकिंग प्रणालीमध्ये अडथळे येणे हे या गोंधळाचे एक प्रमुख कारण ठरले. काही ग्राहकांनी बुकिंग झाल्यानंतरही घरपोच सेवा न मिळण्याच्या भीतीने थेट एजन्सीकडे धाव घेतली.

बडा ताजबाग परिसरातील एका गॅस एजन्सीचे संचालक महेंद्र गवई म्हणाले, “सुमारे दहा तास प्रणाली बंद होती. ग्राहकांचे बुकिंग झाले आहे की नाही हे तपासणेही शक्य नव्हते. काही वर्षांपूर्वी 25 टक्के बुकिंग ओटीपीवर करणे बंधनकारक होते. आता 100 टक्के ओटीपी बुकिंगचा नियम आहे, मात्र प्रणाली इतका ताण सहन करू शकत नाही.”

काही वितरकांनी सांगितले की पूर्वी त्यांच्याकडे काही प्रमाणात सिलिंडर देण्याचा कोटा होता. आता तो बंद करण्यात आल्याने गरजू नागरिकांना मदत करणे कठीण झाले आहे. पूर्वी वितरक ग्राहकांना बुकिंग करण्यातही मदत करत होते, पण ती सुविधाही बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, वाढत्या गर्दीमुळे वितरकांनाही धोका निर्माण झाला आहे. एका वितरकाने सांगितले की काही लोकांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला अडवून आठ सिलिंडर घेऊन पळ काढला. नागरिकांमध्ये वाढत असलेली घबराट लक्षात घेता परिस्थिती नियंत्रणात ठेवणे अवघड होत असल्याचे वितरकांनी सांगितले.