कॉफी नाही, ही बातमी तुमची झोप उडवेल! नवे सर्वेक्षण आले समोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉफी प्यायल्याने रात्रीची झोप लागत नाही किंवा सकाळी थकवा जाणवतो म्हणून अनेकदा कॉफीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, एका नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनाने या समजुतीला छेद दिला आहे. मध्यम वयाच्या व्यक्तींवर केलेल्या या अभ्यासानुसार, जे लोक नियमितपणे कॉफी पितात, त्यांच्या झोपेच्या गुणवत्तेवर कॉफीचा फारसा परिणाम होत नसल्याचे समोर आले आहे. कॉफी सेवनाचे विविध परिणाम आपल्या शरिरावर होतात. मात्र त्याचा अभ्यास करणे अत्यंत गुंतागुंतीचे आहे.

PLOS One या सर्वेक्षण संशोधन करणाऱ्या संस्थेने ही माहिती समोर आणली आहे. यासाठी संशोधकांनी स्वीडनमधील एक केलेल्या या संशोधनात, रोज कॉफी पिणाऱ्यांच्या झोपेची गुणवत्ता आणि दिवसा जाणवणारी सुस्ती यांची तुलना केली गेली. संशोधकांना असे आढळले की, नियमित कॉफी पिणाऱ्यांच्या झोपेत आणि कॉफी न पिणाऱ्यांच्या झोपेत कोणताही लक्षणीय फरक नाही.

संशोधकांच्या मते, कॉफीमधील कॅफिन मेंदूतील ‘ॲडेनोसाइन’ (Adenosine) रिसेप्टर्स ब्लॉक करते. ॲडेनोसाइन हे शरीराला थकव्याची जाणीव करून देते. मात्र, नियमितपणे कॅफिन घेतल्यास मेंदूला त्याची सवय होते, ज्यामुळे कॉफीचा उत्तेजक परिणाम कालांतराने कमी होतो. म्हणजे नियमित कॉफी पिणाऱ्यांच्या झोपेत व्यत्यय येत नाही.

जुन्या संशोधनानुसार, झोपण्यापूर्वी ३ तास आधी कॉफी घेतल्यास झोप लागण्यास उशीर होतो. मात्र, दिवसभरात ठराविक अंतराने कॉफी घेतल्यास शरीराची सहनशक्ती वाढते आणि झोपेवर होणारे परिणाम मर्यादित राहतात.

हे संशोधन जरी आशादायक असले तरी त्यास काही मर्यादा आहेत. हे संशोधन केवळ मध्यवयीन व्यक्तींवर आधारित आहे. तरुण किंवा वृद्धांवर याचे परिणाम वेगळे असू शकतात.

हे ‘क्रॉस-सेक्शनल’ डिझाइनवर आधारित असून सहभागींनी स्वतः दिलेल्या माहितीवर (Self-reported data) अवलंबून आहे, ज्यामुळे त्यात वैयक्तिक चुका असू शकतात.

दिवसाला सहा कपांपेक्षा जास्त कॉफी घेतल्यास अजूनही अस्वस्थता, धडधडणे आणि निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो.

महत्त्वाची सूचना: या सर्वेक्षण संशोधनाची पुष्टी सामना करत नाही. आरोग्याशी निगडीत कोणती गोष्ट ही डॉक्टरांच्या सल्ल्याने अंमलात आणावी.