
राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री अजित पवार यांच्या संशयास्पद विमान अपघातासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे गेल्या महिन्या भरापासून आवाज उठवत आहेत. या प्रकरणात बड्या नेत्यांकडून व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचा बचाव केला जात असल्याचा आरोप याआधीच रोहित पवार यांनी केला होता. आता याप्रकरणी रोहित पवार यांनी व्ही के सिंग पुराव्यांसोबत छेडछाड करत असल्याचा आरोप केला आहे. ”व्ही.के सिंग हे ब्लॅकबॉक्सच्या FDRमधील माहिती एडीट करतायत”, असा आरोप त्यांनी ट्विटरवरून केला आहे.
”फेरफार करण्यात अत्यंत सराईत असलेला VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग सद्यस्थितीला आपल्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून FDR (balckbox चा एक भाग ज्यामध्ये विमानांची सर्व तांत्रिक माहिती रेकॉर्ड झालेली असते) मधील एडिट करत असल्याची माहिती मिळाली आहे. DGCA किंवा AAIB मधील जे कुणी याकामी मदत करत असतील किंवा करणार असतील त्यांनी forensic audit मध्ये हा फेरफार पकडला जाईल, याची नोंद असू द्यावी. उद्या आम्ही संसदेच्या माध्यमातून समिती स्थापन केल्यानंतर (जी होणारच आहे) आणि त्यात forensic audit झाले जे होणारच आहे तेंव्हा VSR कंपनीला वाचवायला कुणीही येणार नाही. तसंच DGCA मध्ये अनेक अधिकारी प्रामाणिक देखील आहेत हेही लक्षात असू द्यावं”, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.
गुरुवारी रोहित पवार यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेत लोकसभेत आवाज उठवून याबाबत निष्पक्ष चौकशी करण्यास सरकारला भाग पाडा, अशी विनंती केली होती. या संदर्भात त्यांनी दिल्लीत विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्याही भेटी घेतल्या आहेत. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार सोनिया गांधी यांचीही भेट घेत रोहित पवार यांनी अजितदादांच्या अपघाताच्या विषयावरही लोकसभेत आवाज उठवण्याची विनंती केली.




























































