
इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घेतलेली पत्रकार परिषद सध्या जागतिक चर्चेचा विषय ठरली आहे. नेतन्याहू यांनी सुन्नी आणि शिया अशा दोन्ही संघटना जगासाठी धोका असल्याचे म्हटले आहे. “हे संकट आपोआप संपेल असे आम्ही सांगू शकत नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी मध्यपूर्वेचा नकाशा आणि परिस्थिती कायमची बदलून टाकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेला इशारा देताना नेतन्याहू यांनी लेबनॉन सरकारला कडक शब्दात सुनावले आहे. “लेबनॉन सरकार आगीशी खेळत आहे. जर हिजबुल्लाहला निशस्त्र केले नाही, तर ते स्वतःचा विनाश स्वतःच करतील,” असे ते म्हणाले. हिजबुल्लाहवर कारवाई करण्यासाठी इस्रायल सज्ज असून, त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
इराणमधील सत्तांतराबाबत भाष्य करताना नेतन्याहू म्हणाले की, तिथल्या जनतेच्या प्रयत्नांशिवाय सध्याची राजवट उलथवून लावणे शक्य नाही. “आम्ही इराणच्या जनतेला संदेश दिला आहे की मदत पोहचणार आहे. जर ही राजवट संपली तर अनेक प्रश्न सुटतील, अन्यथा तिला अत्यंत कमकुवत केले जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, इस्रायल आता पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली झाला असून आमचे शत्रू आणि मित्र देशही आता हे मान्य करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान त्यांनी इराणचे नवे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनी आणि हिजबुल्लाहचा नेता नईम कासिम यांच्याबाबतही एक विधान केले. या नेत्यांच्या जीवाची कोणतीही हमी इस्रायल देणार नाही, असे सांगत त्यांनी थेट युद्धाचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, मी कोणत्याही दहशतवादी संघटनेच्या नेत्याची जीवन विमा पॉलिसी घेणार नाही,” अशा शब्दांत नेतन्याहू यांनी आपल्या शत्रूंना उघडपणे मृत्यूची भीती घातली आहे.
























































