Ratnagiri News – रत्नागिरी, सिंधुदुर्गात महावितरणची 18 कोटी 66 लाखांची वीजबील थकबाकी, वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजेचा वापर केल्यानंतरही वीज बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने महावितरणच्या रत्नागिरी परिमंडळ अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील 1 लाख 18 हजार 237 ग्राहकांकडे 18 कोटी 66 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांत परिमंडळाचे 2 हजार 518 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार वीजग्राहकांनी बिलांचा भरणा देय दिनांकापूर्वी करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

रत्नागिरी परिमंडल अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरगुती 1 लाख 01 हजार 292 ग्राहकांकडे 09 कोटी 41 लाख रूपये, व्यावसायिक 10 हजार 566 ग्राहकांकडे 3 कोटी 65 लाख रुपये,औद्योगिक 1 हजार 548 ग्राहकांकडे 3 कोटी 10 लाख रूपये, सार्वजनिक सेवा 4 हजार 520 ग्राहकांकडे 2 कोटी 27 लाख रूपये आणि इतर वर्गवारीतील 311 ग्राहकांकडे 25 लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी विभागात 28 हजार 726 ग्राहकांकडे 03 कोटी 76 लाख रुपये,चिपळूण विभागात 13 हजार 778 ग्राहकांकडे 2 कोटी 06 लाख रूपये,खेड विभागात 15 हजार 680 ग्राहकांकडे 02 कोटी 49 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील 01 हजार 721 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत केला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विभागात 27 हजार 631 ग्राहकांकडे 04 कोटी 71 लाख रुपये,कुडाळ विभागात 32 हजार 422 ग्राहकांकडे 05 कोटी 64 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील 797 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत केला आहे.