
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ शुक्रवारी पहाटे सुमारे 2:30 वाजता मासे वाहतूक करणारा ट्रक उलटल्याची घटना घडली. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे सुमारे 45 मिनिटांत रस्ता मोकळा करण्यात आला.
अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पथक, महामार्ग वाहतूक पोलीस (बोरघाट विभाग), महाराष्ट्र सुरक्षा दलाची डेल्टा फोर्स आणि मृत्युंजय देवदूत बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्व पथकांनी समन्वयाने बचावकार्य सुरू करत क्रेनच्या साहाय्याने उलटलेला ट्रक सुरक्षित ठिकाणी हलवला.
बचावकार्य सुरू असताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही काळ वाहनांना लोणावळा मार्गे जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर वळवण्यात आले. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याचे टळले.
या अपघातात ट्रकमधील दोन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ट्रक हटवल्यानंतर द्रुतगती मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी दिली.


























































