मला विनोदी चित्रपट बनवायला आवडत नाही! दिग्दर्शक प्रियदर्शन यांचे स्पष्ट वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रियदर्शन हे नाव डोळ्यासमोर येताच, मूड एकदम मस्त होतो. त्यांनी दिग्दर्शित केलेले एक से बडकर एक सिनेमा लगेच आठवतात. परंतु बॉलिवूड आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी मात्र अलीकडेच विनोदी चित्रपटांबद्दल एक स्पष्ट आणि प्रामाणिक मत व्यक्त केले आहे. त्यांना प्रत्यक्षात गंभीर विषयांवरील चित्रपट बनवायला आवडतात. मात्र एकूणच परिस्थिती पाहता त्यांना कॉमेडी चित्रपट दिग्दर्शित करावे लागतात, असे त्यांनी सांगितले.

प्रियदर्शन सध्या त्यांच्या आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट भूत बंगलाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहेत. एका मुलाखतीत बोलताना प्रियदर्शन म्हणाले की, कॉमेडी चित्रपटांमुळे त्यांना मोठे व्यावसायिक यश मिळाले असले तरी दिग्दर्शक म्हणून त्यांना खरी समाधान गंभीर चित्रपटांमधून मिळते. “मला गंभीर चित्रपट शूट करायला आवडतात. मला कॉमेडी चित्रपट बनवायला आवडत नाही. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नसतो, म्हणून मी ते करतो.”

जेव्हा तुम्ही कॉमेडी चित्रपट बनवता तेव्हा तुम्हाला चांगला दिग्दर्शक म्हणून फारसा आदर मिळत नाही. कॉमेडी दिग्दर्शकांकडे अनेकदा जोकरसारखे पाहिले जाते, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. प्रियदर्शन यांच्या मते, ही समस्या केवळ हिंदुस्थानातील चित्रपटसृष्टीपुरती मर्यादित नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरही कॉमेडी चित्रपटांना तुलनेने कमी प्रतिष्ठा मिळते. त्यांनी उदाहरण देताना सांगितले की, मोठ्या पुरस्कारांमध्ये कॉमेडी चित्रपट क्वचितच सन्मानित होतात. त्यामुळे गंभीर चित्रपटांना अधिक प्रतिष्ठा मिळते.

प्रियदर्शन यांनी कांचीवरम आणि कालापाणी सारखे गंभीर विषयांवरील चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारांसह समीक्षकांची मोठी प्रशंसा मिळाली होती. दुसरीकडे त्यांनी विनोदी बाजाचे अनेक सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यात हेरा फेरी, हंगामा, भूल भुलैय्या, भागम् भाग या चित्रपटांचा समावेश होतो.

प्रियदर्शन यांनी 1982 मध्ये दिग्दर्शनाची सुरुवात केली. गेल्या चार दशकांत त्यांनी हिंदी, मल्याळमसह विविध भाषांमध्ये 90 पेक्षा अधिक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.