
निलंगा बस आगारात डिझेल भरताना झालेल्या भीषण दुर्घटनेत गंभीररीत्या होरपळलेले कर्मचारी बस्वराज मठपती (वय ५७) यांचा आज शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अवघ्या दोन महिन्यांवर सेवानिवृत्ती आलेली असतानाच काळाने घाला घातल्याने निलंगा आगारासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार निलंगा बस डेपोमध्ये बसमध्ये डिझेल भरण्याचे काम सुरू असताना अचानक भडका उडाला होता. या आगीत बस्वराज मठपती हे गंभीररीत्या भाजले होते. त्यांच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात (विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था) अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
सेवेची सांगता होण्यापूर्वीच दुर्दैवी अंत
बसूआप्पा मठपती हे मूळचे शिरूर अनंतपाळ येथील रहिवासी होते. आपल्या प्रदीर्घ सेवेतून ते येत्या दोन महिन्यांत सेवानिवृत्त होणार होते. निवृत्तीनंतरचे सुखी आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहत असतानाच या दुर्दैवी घटनेने त्यांचा बळी घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
मठपती यांच्या मृत्यूची बातमी समजताच निलंगा बस आगारातील कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला. अत्यंत मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती. एका सहकाऱ्याचा अशा पद्धतीने अंत झाल्याने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे आणि दुःखाचे वातावरण आहे. शिरूर अनंतपाळ परिसरातही या घटनेमुळे शोककळा पसरली असून, त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.





























































