
ग्रामीण पट्टय़ात वाघ बिबटय़ा आणि अस्वलांचा मुक्तसंचार वाढला आहे. मागील अडीच ते तीन वर्षांत या बिबटय़ाने तब्बल 15 ग्रामस्थांवर झडप घातल्याचेदेखील समोर आले आहे. या वाढत्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने वन क्षेत्रातील संवेदनशील गावांमध्ये एआय आधारित कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
हे कॅमेरे या हिंस्र प्राण्यांवर वॉच ठेवणार आहेत. एकदा हिंस्र प्राणी गावात घुसला तर हे कॅमेरे सायरन वाजवून ग्रामस्थांना सतर्क करणार आहेत. तसेच त्याचा अलर्ट थेट वन विभागाला मिळणार आहे. 15 एप्रिलपर्यंत 40 संवेदनशील कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली. मार्व्हल संस्थेच्या वतीने ‘एआय’ आधारित यंत्रणा वन क्षेत्रातील गावांमध्ये उभारण्याचे काम सुरू आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
गावात वाघ, बिबटे, अस्वल यासारख्या हिंस्र प्राण्यांचा वावर असल्यास ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर केलेले उच्च क्षमतेचे अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे ‘बायो अॅक्युस्टिक्स’ (ध्वनी आधारित) आणि ‘बायो व्हिज्युअल’ (प्रत्यक्ष दृष्य आधारित) अशा दोन प्रकारे काम करतात. वाघ किंवा बिबटे परिसरात आल्यास चितळ, सांबर, माकड यासारखे तृणभक्षी प्राणी आणि मोर विशिष्ट प्रकारचे आवाज काढून संपूर्ण परिसराला सतर्क करतात. ते विशिष्ट आवाज टिपून हे ‘एआय’ तंत्रज्ञान डेटाचे विश्लेषण करून त्यासंबंधीचे सतर्कतेचे इशारे पथकाला पाठवणार आहेत. अशी माहिती मार्व्हल संस्थेचे सीईओ आणि नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.
चार दिवसांत तीन ठिकाणी दर्शन
सध्या तीन ठिकाणी ही यंत्रणा प्रत्यक्षात कार्यन्वित करण्यात आली असून गेल्या आठ दिवसांत दोनदा वाघ आणि बिबटय़ांनी दर्शन दिले. या हिंस्र प्राण्यांचा वावर असल्याचे दिसताच एआय पॅमेऱयांनी ग्रामस्थ आणि वन विभागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. नवेगाव-नागझिरा आणि चंद्रपूर जिह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातही ही यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव असून यासंदर्भात वन विभागाचा मार्व्हल संस्थेशी सामंजस्य करार झाला असल्याचे पोलीस अधीक्षक पोद्दार यांनी सांगितले.





























































