>> स्वप्नील साळसकर, [email protected]
कणकवलीतील तळेरे येथील श्रावणी मदभावे यांनी सामाजिक प्रबोधनाचा उद्देश साध्य करीत विविध उपक्रमांद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल नुकताच त्यांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देत गौरव करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिह्यातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, महिला गट आणि युवक संघटनांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची व्यापक जन चळवळ कणकवली तालुक्यातील तळेरे येथील प्रभावी सामाजिक योगदान देणाऱया श्रावणी मदभावे यांनी उभी केली. तंबाखूविरोधी मोहिमा, मानसिक आरोग्य मार्गदर्शन, किशोरवयीन समुपदेशन आणि सामाजिक प्रबोधनाच्या विविध उपक्रमांद्वारे गेल्या दशकात त्यांनी सुमारे 1 लाख 40 हजारांहून अधिक लोकांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविला असून शासनाचा जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाशझोत.
जिह्यात व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, शिक्षण, युवक प्रबोधन, डिजिटल जागरूकता आणि सामाजिक संस्कार या विविध क्षेत्रांत मदभावे यांनी पंधरा वर्षांहून अधिक काळ सातत्यपूर्ण कार्य केले आहे. महिला बचत गटांसाठी नेतृत्व विकास, आरोग्य मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण तसेच बांबू उद्योगासारख्या उपक्रमांद्वारे मदभावे यांनी महिलांना स्वावलंबनाकडे प्रवृत्त केले. विधवा महिलांसाठी समावेशक कार्यक्रम राबवून सामाजिक मानसिकतेत सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न केला आहे.
शिक्षण क्षेत्रात ‘रविवारची विज्ञान शाळा’ या अभिनव उपक्रमातून ग्रामीण भागातील मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रयोगशीलता विकसित केली. शिष्यवृत्ती, एनएमएमएस, नवोदय, स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, ग्रामसेवक-तलाठी भरती आदींसाठी त्यांनी मोफत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले. त्यातून अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा व राज्यस्तरावर यश संपादन केले असून कित्येक विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, कौशल्य विकास आणि करीअर मार्गदर्शनाद्वारे सक्षम केले आहे.
डिजिटल युगातील वाढत्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षाविषयक विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन, सुरक्षित इंटरनेट वापर, ऑनलाइन फसवणूक प्रतिबंध, डेटा सुरक्षा आणि डिजिटल जबाबदारी याबाबत मदभावे यांनी व्यापक जनजागृती केली. कला, हस्तकला, व्यक्तिमत्त्व विकास आणि कौशल्य वृद्धी यांसाठी नावीन्यपूर्ण स्पर्धा व कार्यशाळांचे मदभावे आयोजन करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी संवाद, आरोग्य मार्गदर्शन आणि सन्मान उपक्रमही राबविण्यात आले आहेत. मदभावे या एमकेसीएलचे अधिकृत अध्ययन केंद्र गेली 14 वर्षे ग्रामीण भागात चालवत आहेत. संगणक शिक्षण देताना समाजभान आणि देशाभिमान यांचा अनोखा संगम साधत डिजिटल साक्षरतेसोबत मूल्याधिष्ठित शिक्षणाचा दिवा त्यांनी सतत तेवत ठेवला आहे.
गडकिल्ले संवर्धनासाठी विशेष उपक्रम
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहिमा, समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रम, वृक्ष लागवड, सीड बॉल कार्यशाळा तसेच गड-किल्ले संवर्धनासाठी युवकांच्या सहभागातून विशेष उपक्रम राबविण्यात आले. कृषिदिन, महिला दिन, तंबाखूविरोधी दिन, वाचन प्रेरणा दिन यांसारख्या विविध दिन विशेषांच्या माध्यमातून संस्कारमय आणि समाजाभिमुख कार्यक्रम आयोजित करण्याचे काम श्रावणी मदभावे यांनी केले आहे.

























































