
अमेरिका, इस्रायल- इराण युद्ध दोन आठवड्यांपासून सुरू आहे. सध्यातरी हे युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार नवे दावे करत जगाची चिंता वाढवत आहेत. तसेच उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनीही इराणमधील आमच्या नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास आम्ही इराणला क्षेपणास्त्रे देऊ, अशी घोषणा करत युद्धाच्या आगीत तेल ओतले होते. आता पुन्हा उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागत शक्तीप्रदर्शन केले आहे.
आखाती युद्ध १५ दिवसांपासून सुरू असताना उत्तर कोरियादेखील युद्धाची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी, उत्तर कोरियाने पूर्व किनाऱ्यावरून समुद्राकडे क्षेपणास्त्रे डागली. दक्षिण कोरिया आणि जपान सरकारने उत्तर कोरियाने १० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याची पुष्टी केली आहे. यापूर्वी, उत्तर कोरियाने 27 जानेवारी रोजी पूर्व समुद्राकडे अनेक कमी अंतराच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण केले होते.
दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफने सांगितले की त्यांना दुपारी १:२० वाजता उत्तर कोरियाच्या सुनान भागातून डागण्यात आलेले क्षेपणास्त्र आढळले. या वर्षी उत्तर कोरियाने डागलेले हे तिसरे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र होते. उत्तर कोरियाने शनिवारी पूर्व किनाऱ्यावरून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, दक्षिण कोरिया आणि जपाननेही याची पुष्टी केली. ही क्षेपणास्त्रे समुद्रात पडली आहेत. उत्तर कोरियाची लष्करी ताकद दाखविण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.
आमचे सैन्य पूर्णपणे सज्ज आहे आणि उत्तर कोरियाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांशी संबंधित माहिती अमेरिका आणि जपानसोबत शेअर करत आहे. याव्यतिरिक्त, आम्ही अतिरिक्त क्षेपणास्त्रांवर बारकाईने लक्ष ठेवत आहोत, असे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. जपान सरकारही या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. उत्तर कोरियाने डागलेली शस्त्रास्त्रे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे असू शकतात. जपानी तटरक्षक दलाने म्हटले आहे की उत्तर कोरियाने डागलेली ही संशयास्पद बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे समुद्रात पडली आहेत.
उत्तर कोरियाने केलेली ही नवीनतम चाचणी अशा वेळी झाली आहे जेव्हा दक्षिण कोरिया आणि अमेरिका त्यांचा वार्षिक वसंत ऋतूतील लष्करी सराव “फ्रीडम शील्ड” करत आहेत. उत्तर कोरिया अनेकदा या लष्करी सरावांना विरोध करतो आणि त्यांना युद्धाची तयारी मानतो. म्हणूनच, क्षेपणास्त्र प्रक्षेपण हा अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सरावांना प्रतिसाद म्हणून आपली लष्करी ताकद दाखविण्याचा प्रयत्न असू शकतो, अशी चर्चा होत आहे.




























































