
>> सुनील हिंगणे
चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडवा हा हिंदू मुहूर्तशास्रात वर्णिलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक. संस्कृतीचे जतन आणि विजयाचे प्रतीक असणारा गुढीपाडवा अनादी काळापासून साजरा होत आला आहे.
वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच सृष्टी नवचैतन्याने न्हाऊन निघते. कोकिळेचे मंजूळ कुजन आणि आम्रवृक्षांना आलेला मोहर मनाला प्रसन्न करतो. या चैतन्यमयी वातावरणात घरासमोर उभारलेली उंच गुढी समृद्ध संस्कृतीची साक्ष देऊन जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडवा हा हिंदू मुहूर्तशास्त्रात वर्णिलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक. संस्कृतीचे जतन आणि विजयाचे प्रतीक असणारा गुढीपाडवा अनादी काळापासून साजरा होत आला आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करून घराघरांच्या प्रवेशद्वारी किंवा गॅलरीत सूर्योदयाच्या वेळी गुढी उभारण्याची परंपरा आहे. भरजरी रेशमी वस्त्र, कडुनिंबाची पाने, आंब्याची डहाळी आणि फुलांचा हार अर्पण करून उभारलेल्या गुढीची षोडशोपचारे पूजा केली जाते व नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत केले जाते.
गुढीपाडव्याच्या संदर्भात अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. ब्रह्मपुराणानुसार याच दिवशी भगवान ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केली आणि कालगणनेला सुरुवात झाली, असे मानले जाते. म्हणूनच याला सृष्टी निर्मितीचा दिन असेही म्हटले जाते. रामायणातील संदर्भांनुसार, प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपवून आणि लंकापती रावणाचा वध करून अयोध्येला परतले तो हाच दिवस होता. अयोध्येतील प्रजेने आपल्या लाडक्या रामरायाच्या आगमनाप्रीत्यर्थ विजयाची गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केला होता. ही गुढी ‘विजयध्वज’ म्हणून ओळखली जाते. गुढी उभारण्यामागे घरामध्ये सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा यावी असा उदात्त हेतू असतो.
या सणाचे एक वैशिष्टय़ म्हणजे कडुनिंबाच्या पानांचे सेवन. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पाने, जिरे, हिंग, गूळ आणि मीठ यांचे मिश्रण करून त्याचे प्राशन केले जाते. रूपकार्थाने हे मिश्रण जीवनातील सुखदुःखाच्या समतोलाचे प्रतीक मानले जाते. भारतीय परंपरेतील सणांमध्ये मिष्टान्न भोजनाला एक वेगळे स्थान आहे. यानिमित्ताने गोडाधोडाचे पदार्थ खाऊन आनंदोत्सव साजरा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून जपली गेली आहे.
गुढीपाडवा हा सण कृषी संस्कृतीशीदेखील निगडित आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि मोहरी यांसारख्या पिकांची काढणी या काळात पूर्ण होते. शेतकरी आपल्या कष्टाचे फळ मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात. वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीमध्ये जे बदल होतात, त्याचे प्रतिबिंब या उत्सवात उमटलेले दिसते. भारतात हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा होतो. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात याला ‘युगादी’ म्हणतात, तर सिंधी समाजात ‘चेटीचंड‘ म्हणून हा दिवस साजरा केला जातो. कश्मीरमध्ये ‘नवरह’ आणि पंजाबमध्ये ‘बैसाखी’ या स्वरूपात नवीन वर्षाचे स्वागत होते. नावे वेगळी असली तरी त्यामागील भावना आणि आनंद एकच असतो.
गुढीपाडव्यापासून नवीन शालिवाहन शकाची सुरुवात होते. यंदाच्या गुढीपाडव्यापासून शालिवाहन शके 1948 प्रारंभ होत आहे. पैठणचे राजा शालिवाहन यांनी अत्यंत पराक्रमाने शकांचा पराभव केला होता. त्या दिवसापासूनच ‘शालिवाहन शक’ ही नवीन कालगणना सुरू झाली. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी लोकांनी आपापल्या घरांवर विजयाची प्रतीके उभारली. आजही महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील अनेक भागांत शालिवाहन कालगणना अधिकृतरीत्या पाळली जाते. सामान्य जनतेच्या प्रबळ इच्छाशक्तीचे आणि अन्यायाविरुद्ध मिळवलेल्या विजयाचे स्मरण म्हणून याकडे पाहिले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन पंचांगाची पूजा केली जाते आणि त्याचे श्रवण केले जाते.
आजच्या धकाधकीच्या जीवनातही गुढीपाडव्याचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही. शहरांमध्ये आता शोभायात्रांचे आयोजन मोठय़ा प्रमाणावर केले जाते. पारंपरिक वेशभूषेत, लेझीमच्या तालावर आणि ढोलताशांच्या गजरात निघणाऱया या यात्रा संस्कृतीचे दर्शन घडवतात. हा सण आपल्याला भूतकाळातील विजयाची आठवण करून देतो आणि भविष्यकाळातील प्रगतीसाठी नवी उमेद देतो. कडू आणि गोड अशा दोन्ही अनुभवांना सोबत घेऊन जीवनाची वाटचाल आनंदाने कशी करावी, ही शिकवण देणारा हा सण आहे. उंच उभारलेली गुढी आपल्याला ध्येयाकडे पाहण्याची आणि प्रगतीची शिखरे सर करण्याची प्रेरणा देते.
(लेखक अध्यात्म अभ्यासक आहेत.)


























































