
>> अरुण
जलशक्ती किती क्षमतेची असू शकते ते अगदी दगड किंवा धातू कापू शकणाऱया वॉटरगनवरून लक्षात येतं. पाण्याच्या प्रवाहाला विलक्षण वेग देऊन त्याचा कटिंग मशीनसारखा वापर या तंत्रात केला जातो. हे झालं कृत्रिमरीत्या जलशक्तीच्या क्षमतेविषयी, परंतु निसर्गात अनेक ठिकाणी कठीण खडक फोडण्याचं काम पाणी करत असतं. भूगर्भातील अच्छिद्र दगडात साठलेलं पाणी हळूहळू सभोवतीचा पत्थर ‘मऊ’ करून आणि भेदून त्यामध्ये भेगा पाडून इतस्ततः पसरण्याचा प्रयत्न करतं. साध्या इमारतींच्या टेरेसवरच्या भेगांमधून सुरुवातीला हळू झिरपणारं पाणी पुढे कॉक्रीटच्या कॉलममध्येही घुसखोरी करून आर्द्रता (डॅम्पनेस) वाढवून इमारतीला धोका निर्माण करू शकतं हे आपण अनेकदा पाहतो.
जलस्रोत खूप मोठे आणि निसर्गतः वेग धारण केलेले असतील तर ते आसपासची जमीन, खडक फोडू शकतात. मुख्यत्वे हे महानद्यांच्या बाबतीत घडतं. उंच पर्वतावरून सागराकडे झेपावणारा नदीचा प्रवाह जितका खळाळता असे तितकी त्या नदीच्या किनाऱयाची धूप आणि तळेटीच्या (तळातील) खडकांची झीज अधिक. त्यातून जलप्रवाह खोल होतात. त्यामुळेच बहुतेक नद्यांमध्ये पाण्यात सहजतेने जाण्यासाठी पंचवीस-तीस पायऱयांचे ‘घाट’ बांधावे लागतात. नद्यांचे प्रवास कडय़ावरून वेगाने कोसळत धबधबे निर्माण करतात आणि कोसळताना कडय़ाची ‘झीज’ करतात. त्यातूनच ‘नायगारा’सारख्या धबधब्यांना घोडय़ाच्या नालेसारखा (हॉर्स शू) आकार येतो.
अमेरिकेतील अॅरिझोना प्रांतात असलेली ‘ग्रॅन्ड कॅन्यन’ किंवा महादरी हा असाच एका नदीच्या पाण्याने घडवलेला प्रताप आहे. प्रपातांच्या (धबधबे) प्रतापापेक्षाही भयंकर! कोलोरॅडो नदीच्या पात्राने हजारो वर्षांत नैसर्गिक जलशक्तीच्या जोरावर लांब आणि सहा हजार फूट खोलीची एक विशाल दरी निर्माण केली. सुमारे दोन अब्ज वर्षांपूर्वीच्या भूगर्भीय रचना स्पष्ट करणारी ही दरी पाहायला दरवर्षी पाच लाख पर्यटक येतात. 60 लाख वर्षांपूर्वी कोलोरॅडो नदीच्या प्रवाहाच्या जागचे खडक झिजू लागले आणि खडकांचे थरच्या थर झिजून खाली खड्डा तयार होऊ लागला. त्यातून नऊ अब्ज वर्षांपूर्वी तयार झालेला पृथ्वीच्या कवचाच्या तळाचा भागही दिसू लागला. भूगर्भ संशोधकांसाठी ‘कोलोरॅडो’ने अभ्यासाची मोठीच संधी उपलब्ध करून दिली यात शंकाच नाही.

























































