
लोहारडोंगरी येथील प्रस्तावित लोहखाण प्रकल्पाच्या विरोधात सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन अखेर दहाव्या दिवशी मागे घेण्यात आले. पालकमंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्यांना लिंबूपाणी पाजून आंदोलनाची सांगता करण्यात आली.
इको-प्रो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे यांनी या लोहखाण प्रकल्पाच्या विरोधात अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला होता. या आंदोलनाची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्यांना लिंबूपाणी पाजून आंदोलन सोडविण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. आंदोलनाच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती बंडू धोतरे यांनी दिली.




























































