
देशात एलपीजीच्या संकटावरून विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले. संसदेच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी सरकारची बोलती बंद केली. ‘अरे मोदी जी, एलजीपी’, ‘नाम नरेंदर, काम सरेंडर,’ अशा घोषणा देत विरोधकांनी लोकसभा दणाणून सोडली. सध्या अधिवेशन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र विधानसभा निवडणूका असलेल्या केरळ, पश्चिम बंगाल व तामिळनाडूमध्ये प्रचारात व्यस्त आहेत. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदींवर जोरदार टीका केली.
”दिल्लीत सध्या एक घोषणा धूम माजवतेय. नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब. नरेंदर जी संसदेत नाही. कुठे आहेत नरेंदरजी केरळमध्ये, तामिळनाडू, पश्चिम बंगाल कुठे आहेत. राहुल गांधी जे म्हणतायत की नरेंद्र मोदी या पुढे संसदेत येणार नाही त्यात तथ्य आहे. त्यांना संसदेत यायला तोंड राहिलेलं नाही”, अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी केली आहे.
”कोविड काळात ऑक्सिजनची कमतरता होती तेव्हा उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक हॉस्पिटलला ऑक्सिजन, इंजेक्शन मिळतील याची काळजी घेतली. अशा प्रकारची काळजी फडणवी, शिंदे आणि सुनेत्रा वहिनींनी घेतलेली मला अजिबात दिसत नाही. हॉस्पिटलमध्ये, सार्वजनिक ठिकाणी गॅस अभावी कॅन्टीन बंद झाले असतील तर लोकांनी जगायचं कसं? देवेंद्रजी, नरेंद्रजी बोलतात सर्व काही ठिक आहे. वर्षा बंगल्यावर ठिक असेल. तिथल्या गटारातून पाईप टाकून तुम्ही गॅस काढत असाल. मग लोकांना पण ते सांगा, किमान पाईप तरी पुरवा गॅस काढायला. माझ्या बायकोला सिलेंडर मिळत नाहीये. सकाळपासून मला 60 ते 70 लोकं भेटले की सिलेंडर कुठून मिळवायचा. देशभरात हिच परिस्थिती आहे. यात भ्रम काय आहे. जर सर्व काही ठिक आहे तर एवढ्या मोठ्या रांगा का आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी केला.


























































