Gudipadava festival – गुढीपाडव्याला झाली सृष्टीची निर्मिती, चार युगांची संकल्पना…जाणून घ्या प्राचीन कालगणना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> योगेश जोशी

गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्ष सुरू होते. यंदा 19 मार्च रोजी नववर्ष सुरू होत आहे. नववर्षाच्या सुरुवातीला संवत्सरफल वाचण्याची किंवा ते श्रवण करण्याची प्राचीन पंरपरा आहे. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, अशी मान्यता आहे. सृष्टीची निर्मिती केल्यानंतर समाजस्थापना, रीतीभाती, परंपरा, संस्कृती आणि समाज सुशिक्षित होण्यासोबतच सुसंस्कृत असावा, याप्रकारे व्यवस्था करण्यात आली. तसेच कालगणनेसाठी काही पद्धती निश्चित करण्यात आल्या.

दरवर्षी नववर्षाच्या सुरुवातील संवत्सरफल सांगण्याची प्रथा आहे. त्यावेळी प्राचीन कालगणनेची माहिती मिळते. जाणून घेऊया चार युगे, संवत्सर आणि संवत यांची माहिती.

।। स्वस्तिश्रीसूर्यसिद्धांतमतेन समस्तजगत् उत्पत्तिस्थितिलयकारणश्रीमहाविष्णोर्नाभिकमलोद्भवस्य वर्तमानब्रह्मणः परमायुर्वर्षशतं तत्रार्थ यातम्। उत्तरपंचाशदब्दे प्रथममासे प्रथमपले प्रथमदिवसे त्रयोदशघटिकाः राशीन् द्विचत्वारिंशत्पलानि अक्षरत्रयं च गतम् ।।४।।

श्रीसूर्यसिद्धांतमताने जगाची उत्पत्ति होताच ज्या संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्रीमहाविष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या उत्कर्ष ब्रह्मदेवाचे आयुष्य शंभर वर्षे आहे. त्यापेकी पन्नास वर्षे होऊन गेली. सांप्रत एक्कावन्नाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका १३, पळे ४२ महेश्वर आणि तीन अक्षरे होऊन गेली. चार युगे एक हजार वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात १४ मनु होतात. त्यांची नावे – स्वायंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णि, दक्षसावर्णि, ब्रह्मसावर्णि, धर्मसावर्णि, रुद्रसावर्णि, देवसावर्णि, इंद्रसावर्णि असे एकूण 14 मनू आहेत. त्या एकेक मनूत ७१ महायुगे होतात. एका महायुगाची वर्षे ४३ लक्ष २० हजार आहेत. या प्रमाणे चाक्षुषपर्यंत होऊन गेले. चालू असलेले वैवस्वत मन्वंतर सातवे आहे. वैवस्वत मन्वंतरातील २७ महायुगे जाऊन अठ्ठाविसावे महायुग चालू आहे. कृतयुगाची वर्षे १७ लक्ष २८ हजार, त्रेता युगाची वर्षे १२ लक्ष ९६ हजार, द्वापार युगाची व वर्षे ८ लक्ष ६४ हजार. सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्षे ४ लक्ष ३२ हजार वर्षे आहेत.

तन्मध्ये भोजन षट्शककर्तारः। आदौ इंद्रप्रस्थे युधिष्ठिर शकः चतुश्चत्वारिंशदधिकत्रिसहस्त्रयुताब्दाः ।। संपूर्ण द्वितीय उज्जयिन्यां विक्रमस्तस्य शकः पंचत्रिंशदधिकशतयुताब्दाः ।। तृतीयः श्रवण प्रतिष्ठाननगरे शालिवाहनस्तस्य शकः अष्टदशसहस्रवर्षाणि ।। चतुर्थो वैतारण्यां . विजयाभिनंदनस्तस्य शकः दशसहस्त्रवर्षाणि ।। पंचमो गाँडदेशे धारातीर्थे नागार्जुनस्तस्य शकः चतुर्लक्षवर्षाणि ।। षष्ठः करवीरपत्तने कर्नाटके कल्क्यवतारः तस्य शकः एकविंशत्यधिकाष्टशत मिताब्दाः ।। ५ ।।

कलियुगामध्ये सहा शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर (धर्मराज) झाला. त्याचा शक ३ हजार ४४ वर्षे, दुसरा उज्जयिनीत विक्रम झाला. त्याचा शक १३५ वर्षे, तिसरा पैठण येथे शालिवाहन झाला. त्याचा शक १८ हजार वर्षे. चौथा वैरिणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल. त्याचा शक १० हजार वर्षे, पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल. त्याचा शक ४ लक्ष वर्षे, सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल. त्याचा शक ८२१ वर्ष. कलियुगाच्या एकंदर वर्षातून ५१२७ वर्षे झाली आहेत. तर ४ लक्ष २६ हजार ८७३ वर्षे शिल्लक आहेत. अशा प्रकारे प्राचीन कालगणना असल्याचे सांगितले जाते.