
यावर्षी मार्चच्या मध्यावरच पारा चाळिशीकडे जात असल्याने धरणांतील पाण्याची वेगाने वाफ होत असल्याने पाणीसाठा झपाटय़ाने घटत आहे. राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा आताच 60.37 टक्क्यांवर आला आहे. यातच यावर्षी पाऊस लांबण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आल्यामुळे पुढील चार महिने पाणीपुरवठय़ाचे आव्हान राज्याच्या जलसंपदा विभागासमोर आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत उष्णतेची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या जलसंपदा विभागाने शुक्रवारी राज्यातल्या विविध धरणांतील पाणी साठय़ाचा आढावा घेतला. राज्याच्या विविध जिह्यांत लहानमोठी आणि मध्यम अशी सुमारे 3 हजार 11 धरणे आहेत. या सर्व धरणांत मिळून 60.37 टक्के पाणीसाठा आहे. मागच्या वर्षी याच काळात 53.06 टक्के पाणीसाठा होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा अधिक आहे. कारण अनेक ठिकाणी पाऊस लांबला होता आणि काही भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. पण पाणीसाठा काही प्रमाणात वाढला असे निरिक्षण जल अभियंत्यांनी नोंदवले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे मोठय़ा प्रमाणावर बाष्पीभवन होते. त्यामुळे आता वेळोवेळी पाणीसाठय़ांचा आढावा घेण्यात येणार आहे.
कोकणात सर्वात कमी धरणे
राज्यात सर्वाधिक म्हणजे 922 लहानमोठी आणि मध्यम स्वरुपाची धरणे एकटय़ा संभाजीनगरात आहेत. या भागातील धरणांमध्ये 63.27 टक्के पाणीसाठा आहे. नागपूरमध्ये 62.09 टक्के, अमरावतीमध्ये 63.07 टक्के, नाशिकमध्ये 60.27 टक्के पाणीसाठा आहे. इतर जिह्यांपेक्षा कोकणात पावसाचे प्रमाण अधिक आहे. पण तरीही कोकणात सर्वात कमी म्हणजे फक्त 173 लहान मोठी धरणे आहेत. आजच्या घडीला राज्यात सर्वात कमी म्हणजे 57.75 टक्के पाणीसाठा आहे.
राज्यातील पाणीसाठा
नागपूर 62.09 टक्के
अमरावती 63. 07 टक्के
संभाजीनगर 63. 27 टक्के
नाशिक 60. 56 टक्के
पुणे 58. 34 टक्के
कोकण 57. 75 टक्के
मुंबईसाठी उपलब्ध पाणी
मध्य वैतरणा 42. 40 टक्के
मोडकसागर 54. 89 टक्के
तानसा 52. 13 टक्के
भातसा 59. 19 टक्के




























































