उत्तर कोरियाने जगाची चिंता वाढवली; अण्वस्त्रवाहक रॉकेट लाँचर्सची केली चाचणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका, इस्रायल-इराण युद्धाच्या झळांनी जग होरपळत असताना आता उत्तर कोरिया जगाची चिंता वाढवत आहे. उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन आणि त्याच्या मुलीच्या उपस्थितीत अण्वस्त्र वाहण्यास सक्षम रॉकेट लाँचर्सची चाचणी केली. या यशस्वी चाचणीमुळे ४२० किमीच्या पल्ल्यातील शत्रू आमच्या मारक क्षमतेत येतील. त्यामुळे आमच्या शत्रूंमध्ये अस्वस्थता पसरली आहे, असे किम जोंग उन म्हणाले.

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी शनिवारी १२, ६०० मिमी-कॅलिबर मल्टिपल रॉकेट लाँचर्सच्या चाचणी-प्रक्षेपणाचे निरीक्षण केले, असे केसीएनए या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या आठवड्यात अमेरिका आणि दक्षिण कोरियाने दक्षिण कोरियामध्ये वार्षिक प्रमुख सराव सुरू केल्यानंतर उत्तर कोरियाने या चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे हे उत्तर कोरियाचे शक्तीपरीक्षण असल्याचे मानले जात आहे.

या चाचण्यांमुळे ४२० किमीच्या अंतरावरील शत्रूंना लक्ष्य करता येणार आहे. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता आहे, असे किम जोंग उन म्हणाले. या चाचण्यांवेळी किम आणि त्यांची मुलगी आणि संभाव्य उत्तराधिकारी किम जू एई उपस्थित होते. प्रक्षेपित केलेल्या रॉकेटने कोरियाच्या पूर्व समुद्रातील बेटाच्या लक्ष्यावर सुमारे ३६४.४ किमी अंतरावर १०० टक्के अचूकतेने मारा केला आणि ही चाचणी यशस्वी झाली.

दक्षिण कोरियाच्या लष्कराने शनिवारी सांगितले की उत्तर कोरियाने देशाच्या पूर्व किनाऱ्यावरील समुद्राकडे १० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. स्थानिक वेळेनुसार दुपारी १:२० वाजता राजधानी प्योंगयांगजवळील भागातून ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यानंतर आता उत्तर कोरियाने अण्वस्त्र वाहण्यास सक्षम रॉकेट लाँचर्सची चाचणी केली.  उत्तर कोरियाच्या या चाचणीने जगाची चिंता वाढली आहे.