
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजवले आहे. आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचीही घोषणा करण्यात आली आहे. यात पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचा समावेश आहे. या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत भावूक पोस्ट केले आहे. “ज्या निवडणुकीत फक्त मताधिक्याचीच चर्चा व्हायची, त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल, असं कुणाला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. पण दुर्दैवाने अजितदादा आपल्यातून गेले आणि आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बारामतीचा गड अनेक दशके अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राहिल्याने या पोटनिवडणुकीची चर्चा आता राज्यभर रंगली आहे.
ज्या निवडणुकीत फक्त मताधिक्याचीच चर्चा व्हायची त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल, असं कुणाला स्वप्नातही कधी वाटलं नाही.. पण दुर्दैवाने अजितदादा आपल्यातून गेले आणि आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली..
कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 15, 2026
पोटनिवडणुकीच्या या बातमीने बारामतीकरांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा हळहळ व्यक्त होत आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटच्या शेवटी, “कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर असतं..!” असे म्हणत आपली खंत व्यक्त केली आहे.




























































