
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 रहिवाशांची स्वप्नपूर्ती होणार असून त्यांना टू बीएचके घरे मिळणार आहेत. सोमवारी सकाळी 10 वाजता नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप केले जाईल. यामध्ये निवृत्त पोलीस, त्यांचे वारस व कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांच्या 423 घरांचाही समावेश आहे.
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या 6.45 हेक्टर जागेवर तळ अधिक 3 मजल्यांच्या 42 चाळींमध्ये 3344 भाडेकरू वास्तव्यास आहेत. दोन टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पात 23 मजल्यांच्या 20 पुनर्वसन इमारती उभारल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये नायगाव बीडीडी चाळीतील प्लॉट ‘ब’मधील 1401 रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यामध्ये 8 पैकी 5 पुनर्वसन इमारतींतील 864 घरांच्या चाव्या प्रदान केल्या जात आहेत. उर्वरित 537 घरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून एप्रिलमध्ये हे काम पूर्ण होणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल’ असे नामकरण करण्यात आले आहे. सुमारे दोन ते तीन पिढय़ांपासून 160 चौरस फुटांच्या लहानशा खोलीत राहणाऱ्या रहिवाशांना 500 चौरस फुटांच्या आलिशान टू बीएचके घरात राहण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश
n या प्रकल्पात वरळी, ना.म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील 86 एकर जागेवर वसलेल्या 195 चाळींचा समावेश असून 15 हजार 593 रहिवाशांचे पुनर्वसन म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत केले जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवात झाली.
n शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वेळोवेळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. तसेच रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला.






























































