
बेकायदेशीरपणे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी बनवण्यात आलेले ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026’ शुक्रवारी विधानसभेत सादर केले गेले. त्या विधेयकावर उद्यापासून सलग तीन दिवस सभागृहात चर्चा होणार असून ती वादळी होण्याची शक्यता आहे.
बळजबरीने, फसवणूक करून किंवा आमिष दाखवून धर्मांतर केले जात असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने हे विधेयक आणले गेले आहे. धर्मांतराला भारतीय जनता पक्ष व अन्य हिंदुत्ववादी पक्षांचा सातत्याने विरोध राहिला आहे. दुसरीकडे समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी लव्ह जिहाद अशी संकल्पनाच नसल्याचा दावा विधानसभेत अनेकदा केला होता. त्यामुळे धर्मस्वातंत्र्य विधेयकावरील चर्चेदरम्यान खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तीन दिवसांच्या चर्चेमध्ये सर्व आमदार या विधेयकाबाबत आपली भूमिका मांडतील. त्यानंतर मतदान घेतले जाईल आणि विधेयक संमत झाल्यास विधान परिषदेत पाठवले जाईल. विधान परिषदेच्या संमतीनंतर ते राज्यपालांकडे अंतिम स्वाक्षरीसाठी पाठवले जाईल आणि त्यांच्या सहीनंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल.


























































