वर्षभरात फुकट्या प्रवाशांकडून वसूल केला एक कोटी रुपयांचा दंड, मध्य रेल्वेचे TTE मोहम्मद शम्स चंद यांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एका प्रवासी तिकीट निरीक्षकाने (TTI) यंदाच्या आर्थिक वर्षात तिकीटविना प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड वसुलीत नवा विक्रम नोंदवला आहे. मोहम्मद शम्स चंद यांनी तिकीटविना आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल 1 कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे.

सध्याचे आर्थिक वर्ष संपण्यास अजून पंधरवडा बाकी असताना मोहम्मद शम्स चंद यांनी ही कामगिरी केली आहे. 1 एप्रिल 2025 ते 15 मार्च 2026 या कालावधीत त्यांनी तिकीटविना प्रवासाच्या 11,483 प्रकरणांचा शोध घेत प्रवाशांकडून एकूण 1,00,38,505 रुपये दंड वसूल केला.

मोहम्मद शम्स चंद हे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कार्यरत असून ते ‘ओपन डिटेल बॅच’चे सदस्य आहेत. टीटीआय, म्हणजेच तिकीट तपासनीस किंवा टीसी म्हणून ओळखले जाणारे अधिकारी प्रवाशांची तिकिटे तपासणे आणि वैध तिकीट नसलेल्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करणे ही जबाबदारी पार पाडतात.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मोहम्मद शम्स चंद यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे रेल्वेचे मोठे महसूल नुकसान टळले आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे तिकीट तपासणी विभागाची प्रतिष्ठा वाढली असून इतर कर्मचाऱ्यांसाठीही त्यांनी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

दरम्यान, तिकीटविना प्रवासावर कठोर कारवाई होत असल्याने मध्य रेल्वेने प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. प्रवासी अधिकृत विक्रेत्यांकडून, रेल्वे आरक्षण काउंटरवरून, ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशिन (ATVM) मधून, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या संकेतस्थळावरून किंवा ‘RailOne’ मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून तिकीट खरेदी करू शकतात, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.