
न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान आयर्लँडमध्ये वळवण्यात आले. स्थानिक वेळेनुसार पहाटे 4.30 वाजता विमानाचे आयर्लंडच्या शॅनन विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप आहेत. विमानाची तपासणी सुरू आहे.
एअर इंडियाच्या विमानाने न्यूयॉर्कहून दिल्लीसाठी उड्डाण केले. मात्र हवेत विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान आयर्लंडला वळवण्यात आले. एअर इंडियाने घटनेची पुष्टी केली असून प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे. प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना सर्व आवश्यक मदत पुरवण्यासाठी आपण शॅनन विमानतळ अधिकारी आणि स्थानिक एजन्सींच्या संपर्कात आहोत. त्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.

























































