दुबई विमानतळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर मर्यादीत प्रमाणात उड्डाणे पुन्हा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुबईमध्ये झालेल्या ड्रोनहल्ल्यामुळे तात्पुरती थांबवण्यात आलेली उड्डाणे आता हळूहळू पुन्हा सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती नुकतीच दुबई मीडिया कार्यालयाकडून देण्यात आली आहे. प्रवाशांनी त्यांच्या उड्डाणांबाबत ताज्या माहितीसाठी संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे. ड्रोन घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून, दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरील काही उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर निवडक मार्गांवरील उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत.

एमिरेटस् विमान कंपनीने सांगितले की, सकाळी 10 नंतर मर्यादित उड्डाण वेळापत्रकानुसार सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. ड्रोन घटनेमुळे काही काळ सर्व उड्डाणे थांबवण्यात आली होती आणि प्रवाशांना अद्ययावत माहिती मिळेपर्यंत विमानतळावर येऊ नये, असा सल्ला देण्यात आला होता. फ्लायदुबईने देखील 16 मार्चपासून हळूहळू उड्डाण सेवा पुन्हा सुरू केल्याचे सांगितले आहे. कंपनीने प्रवाशांना रद्द किंवा बदललेल्या उड्डाणांची माहिती देण्यासाठी संपर्क सुरू केला आहे. प्रवाशांनी उड्डाणाची खात्री झाल्याशिवाय विमानतळावर येऊ नये, असा सल्लाही देण्यात आला आहे. ड्रोनच्या अवशेषांमुळे विमानतळाजवळील इंधन टाकीजवळ आग लागल्याची माहिती समोर आली. मात्र बचाव पथकांनी तत्काळ कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले.

अधिकाऱ्यांच्या मते सध्याच्या घडीला, आग पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्याचबरोबर ती आग इतर ठिकाणी पसरलेली नाही. तसेच या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर काही उड्डाणे अल मकटोम इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे वळवण्यात आली. तसेच वाहतुकीच्या सुरक्षेसाठी एअरपोर्टकडे येणारे रस्ते आणि टनेल्स तात्पुरते बंद करण्यात आले होते.
11 मार्चला दोन ड्रोन दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टजवळ पडले होते. त्या वेळी विमान वाहतुकीवर परिणाम झाला नव्हता, मात्र त्यावेळी दोन घानाचे नागरिकांसह एक हिंदुस्थानी नागरीक यांना किरकोळ दुखापत झाली होती.