सामना अग्रलेख – गॅस टंचाई! लोकांना खरे काय ते सांगा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना घालविण्यासाठी थाळ्या भांडी वाजवण्याचा उपक्रम मोदींनी तेव्हा जनतेला दिला. आता गॅस सिलिंडरची टंचाई घालविण्यासाठी रिकामे सिलिंडर्स रस्त्यावर आणून बडवायचे काय? मध्य प्रदेशात गॅस सिलिंडर गोदाम एजन्सींना सशस्त्र पोलीस संरक्षण द्यावे लागले आहे. मोदींच्या काशी माँ अन्नपूर्णाची रसोईगॅसच्या तुटवड्यामुळे बंद झाली. हे चित्र असताना देशात गॅस टंचाई नाही. उगीच मोदींना बदनाम करू नका,’ अशी मखलाशी करणे हा सामाजिक अपराध आहे. लोकांना विश्वासात घेऊन खरे काय ते सांगणे हे ज्या राज्यकर्त्यांना जमत नाही ते राज्यकर्ते राष्ट्र चालवायला कुचकामी ठरतात. भारतात तेच घडत आहे. मोदींनी त्यांच्या भक्तांनी देवाला तरी घाबरावे इतकीच माफक अपेक्षा आहे!

भारतीय जनता पक्ष हा एक गोंधळलेला पक्ष आहे. देशातील इंधन आणि गॅस सिलिंडरच्या तुटवड्याबाबत त्यांचा गोंधळ स्पष्ट झाला आहे. अंधभक्तांचे लाडके पंतप्रधान मोदी यांनी तेल किंवा गॅस टंचाईवर शब्द काढलेला नाही, पण त्यांचे बिनडोक प्रवत्ते मात्र देशात अजिबात गॅस टंचाई नसल्याची दूषित हवा सोडत आहेत. याबाबतीत पंतप्रधान मोदींना बदनाम करू नका. संघर्ष थांबविण्याची क्षमता फक्त मोदींमध्येच आहे व हे असे अमेरिकेचे मत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी परस्पर जाहीर करून भलताच हास्यस्फोट घडवला आहे. पंतप्रधान मोदी हे संघर्ष थांबवू शकतात किंवा गॅस, इंधन टंचाईवर मात करू शकतात असे अमेरिकेतील कोणत्या दीड शहाण्याने सांगितले ते देशाला कळायलाच हवे. मोदी किंवा त्यांच्या पक्षाने आपल्या देशासाठी संघर्ष केल्याची नोंद इतिहासाच्या कोणत्याच पानावर नाही. पहलगाम हल्ल्यात 26 हिंदूंची हत्या झाली. त्यानंतर पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, पण तो संघर्षही प्रे. ट्रम्प यांच्या दबावामुळे मोदींनी अर्धवट थांबवला. भाजप व संघर्ष यांचे दूरदूरपर्यंत नाते नाही. ते संघर्ष करत नाहीत. त्यामुळे इतरांमधील संघर्ष थांबवण्याची क्षमता त्यांच्यात दिसत नाही. आता मूळ विषयाकडे वळू या. भारतात अजिबात गॅस टंचाई नसल्याचा दावा बिनडोक भाजप प्रवत्ते करतात. त्यास भारत

सरकारची मान्यता

आहे काय? मुंबईतील अनेक भागांत घरगुती गॅस सिलिंडरसाठी एक ते दीड किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. हे चित्र फक्त मुंबई-महाराष्ट्रात नाही, तर देशभरात आहे. लोक रात्रीपासून सिलिंडर मिळविण्यासाठी रांगेत उभे आहेत व मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, सर्व ठीक आहे. म्हणजे लोक रांगेत उभे आहेत हे त्यांना ठीक वाटत आहे. गॅस टंचाई नाही, मग 40 टक्के खाणावळी, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थांच्या गाड्या बंद का पडल्या आहेत व अनेक ठिकाणी कोळसा दुकानांवर झुंबड का उडाली आहे? काही छोटय़ा हॉटेलांत सरपण-लाकडांवर अन्न शिजवले जात आहे. सरकारने आता असा आदेश काढला की, ज्यांना पाइपद्वारे गॅस पुरवठा होतो, त्यांना एलपीजी कनेक्शन परत करावे लागेल. याचा अर्थ सरळ आहे. सरकारने इंधन व गॅस टंचाईची आणीबाणी जाहीर केली आहे. रुग्णालय, स्मशानभूमी, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक सेवांना प्राधान्याने गॅस पुरवठा करू असे सरकारने जाहीर केले. म्हणजे गॅसचा तुटवडा वाढत आहे यावर सरकारने शिक्कामोर्तब केले. तरीही भाजप प्रवत्ते म्हणतात, ‘गॅस’चा तुटवडा नाही. सर्व ठीक आहे. सध्याची इंधन टंचाई हे एक जागतिक संकट आहे व त्या संकटाशी जनतेला सामना करावा लागेल. जनतेची मानसिकता त्यादृष्टीने तयार करणे गरजेचे आहे, पण याप्रश्नी

सरकार खोटे

बोलत आहे. खोटे बोलून प्रश्न सुटणार नाही. साईबाबांच्या शिर्डी संस्थानात प्रसादाचे दोन लाडू दिले जात होते. आता एकच लाडू दिला जातो. प्रसादालयातील जेवणाच्या थाळीतही काटछाट झाली. प्रत्यक्ष संत-देवांच्या दरबारातच गॅस टंचाईच्या झळा बसल्या असताना सरकारने व भाजपने खोटे बोलणे थांबवले पाहिजे. गॅस सिलिंडर काळ्या बाजारात पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचले. कॅटरिंग व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. हॉटेलातील मेन्यू कार्डावरून अनेक पदार्थ गायब झाले आहेत. ते गॅस टंचाईमुळे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे प्रवक्ते सर्व आलबेल आहे असेच सांगत आहेत. कोरोना घालविण्यासाठी थाळ्या व भांडी वाजवण्याचा उपक्रम मोदींनी तेव्हा जनतेला दिला. आता गॅस सिलिंडरची टंचाई घालविण्यासाठी रिकामे सिलिंडर्स रस्त्यावर आणून बडवायचे काय? मध्य प्रदेशात गॅस सिलिंडर गोदाम व एजन्सींना सशस्त्र पोलीस संरक्षण द्यावे लागले आहे. राजस्थानात सिलिंडर घेऊन जाणारे ट्रक आणि टेम्पो रस्त्यात अडवले जात आहेत. दिल्लीतील भीषण उन्हात लोक ‘गॅस’साठी रांगेत आहेत. मोदींच्या ‘काशी’त माँ अन्नपूर्णाची ‘रसोई’ गॅसच्या तुटवड्यामुळे बंद झाली. हे चित्र असताना ‘देशात गॅस टंचाई नाही. उगीच मोदींना बदनाम करू नका,’ अशी मखलाशी करणे हा सामाजिक अपराध आहे. लोकांना विश्वासात घेऊन खरे काय ते सांगणे हे ज्या राज्यकर्त्यांना जमत नाही ते राज्यकर्ते राष्ट्र चालवायला कुचकामी ठरतात. भारतात तेच घडत आहे. मोदींनी व त्यांच्या भक्तांनी देवाला तरी घाबरावे इतकीच माफक अपेक्षा आहे!